पुणे – कारवाईतून आरटीओने पीएमपीला वगळले!

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी बसेसवर कारवाईचा धडाका


मोटार वाहन नियम पीएमपीसाठी नाही का?


पीएमपीची साधी तपासणीही नाही


जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

पुणे – मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर आरटीओकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. तर दुसरीकडे सर्रासपणे उल्लंघन करत असलेल्या पीएमपी बसेसची साधी तपासणीही केली जात नाही. अनफिट, खिळखिळ्या पीएमपीविरोधात महिन्याला हजारो तक्रारी येत असून सुद्धा कारवाई होत नसल्याने आरटीओ प्रशासनच पीएमपीला पाठीशी घालत असल्याचा आरोपी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे. तसेच, मोटार वाहन नियम पीएमपीला लागू आहे की नाही? असा सवालही प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या बेशिस्त ट्रॅव्हल्स चालकांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वायुवेग पथकाकडून कारवाई सुरू आहे. पथकाने 24 ते 28 जानेवारीदरम्यान शहरातील विविध ठिकाणी तब्बल 200 पेक्षा जास्त ट्रॅव्हल्सची तपासणी केली. तर यातील पन्नासपेक्षा जास्त बसेसवर कारवाई करण्यात आली आहे. अनफिट बसेस, अवैध प्रवासी वाहतूक, टपावरून मालवाहतूक आदींचा ठपका ठेवत ही कारवाई सुरू आहे. त्यांच्याकडून लाखोंचा दंडही वसूल करण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे रोजच प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या पीएमपी बसेसवर आरटीओ प्रशासन मेहेरबान असल्याचे दिसून येत आहे. ब्रेकडाऊनचे वाढते प्रमाण, खिळखिळ्या झालेल्या बसेसमधून रोज वाहतूक सुरू असून अनेक मोटार वाहन नियमांचा भंग होत आहे. असे असतानाही आरटीओ प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने प्रवाशांकडून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीएमपीसाठी अपुऱ्या मनुुष्यबळाचे कारण
पीएमपीच्या ताफ्यात खिळखिळ्या बसेसची संख्य मोठी असून यातून धोकादायक पध्दतीने वाहतूक सुरू आहे. याबाबत आरटीओने एका बसवर कारवाई केली. यात संबंधित बस अनफिट आढळल्याने योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळाअभावी कारवाई शक्‍य नसल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. दुसरीकडे मात्र खासगी बसेसवर जोरदार कारवाई सुरू असल्याचे दिसून येत आहे.

महसूलाअभावी कारवाईकडे दुर्लक्ष
खासगी बसेसवर कारवाई करून लाखोंचा महसूल वसूल केला जात आहे. पीएमपीकडून कारवाईनंतर काही महसूल हाती लागणार नसल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. आरटीओकडून राज्य-परराज्यात जाणाऱ्या बससेची तपासणी केली जाते. दुसरीकडे मात्र, शहरांतर्गत रोज लाखो प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसमधून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.

ब्रेक फेलमधून वाचले प्रवासी
गेल्या आठवड्यात नऱ्हे-आंबेगाव येथील मार्गावरील बसचे अचानक ब्रेक निकामी झाले. यावेळी सुमारे चाळीस प्रवासी बसमध्ये होते. चालकांच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली असली तरी अशा अनेक अनफिट बसेस ताफ्यात आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

पीएमपी ताफ्यातील जून्या बसेस ब्रेकडाऊन होण्याचे कारण देण्यात येत असले तरी अनेक सुस्थितीतील बसेसही नादुरुस्त आहेत. याकडे पीएमपी प्रशासनचे दुर्लक्ष होत आहे. तर दुसरीकडे आरटीओ प्रशासनाकडूनही अपुऱ्या मनुष्यबळाचे कारणदेत बसेस तपासणी होत नसल्याने या सर्वांमध्ये सर्वसामान्य प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
– जुगल राठी, अध्यक्ष, पीएमपी प्रवासी मंच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)