पुणे – काय सांगता? घाटाची पायरी ‘लाख’मोलाची!

मुलांना नदीपात्रात खेळायला उतरण्यासाठी भाजप नगरसेवकाने बांधला घाट


नगरसेवक आणि अभियंत्याचे धक्कादायक स्पष्टीकरण

पुणे – डीपी रस्ता झाल्याने बाजूच्या वस्तीतील मुलांना खेळायला जागा नाही. तसेच नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर दलदल आणि झाडी असल्याने डास, डासही मोठ्या प्रमाणात होतात. नदीपात्रात स्वच्छता करता यावी आणि खेळायलाही जागा उपलब्ध व्हावी, यासाठी त्या पायऱ्या बांधल्याचे धक्कादायक स्पष्टीकरण स्थानिक नगरसेवक जयंत भावे आणि वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता सतीश टाले यांनी दिले आहे. विशेष असे, की यापूर्वी नदीपात्रात करण्यात आलेल्या बांधकामावरून हरित लवादाने महापालिकेचे अनेकदा कान टोचले असताना कुठलाही विचार न करता हे काम करण्यात आल्याने कामाच्या हेतूबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहेत.

म्हात्रे पुलावरील डीपी रस्त्यावर ज्ञानदा शाळेसमोर नदीकाठी शाहू वसाहत आहे. या वसाहतीमधील झोपडीवजा घरे अगदी नदीपात्राला खेटून आहे. नदी आणि घरांच्यामध्ये काही ठिकाणी संरक्षक भिंत असून, रस्त्यावरून आतीलबाजूच्या झोपड्यांकडे जाण्यासाठी अक्षरश: दोन फुटांची पायवाट आहे. सीमाभिंतीला लागून असलेल्या नदीपात्रात तीव्र उतार असून, पात्रात खालील बाजूस प्रचंड दलदल आणि मोठ्याप्रमाणावर झाडी उगवलेली आहेत. परंतु महापालिकेच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाने या दलदलीच्या ठिकाणी घाट बांधण्याचे काम हाती घेतले आहे. वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाने या कामाचे 9 लाख 97 हजार 870 रुपयांचे पूर्वगणन पत्रक तयार केले. या कामाची निविदा काढण्यात आली. निविदा पॉईंट 99 टक्के (.99%) कमी दराने आली. तीन महिन्यांच्या मुदतीत करायच्या या कामाची वर्क ऑर्डर सर्वात कमी दराने आलेल्या के.के.कंपनीला देण्यात आली आहे.

पायऱ्या बांधण्याचे काम सुरू करण्यात आले असून, ते करत असताना तीन झाडेही तोडण्यात आली आहेत. साधारण 15 फूट लांब जागेत तीन ते चार फूट रुंदीच्या 14 पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत.

डीपी रोडचे रुंदीकरण झाल्याने शाहू वसाहतीसमोर जागाच उरली नाही. यामुळे येथील मुलांना खेळायलाही जागा राहिलेली नाही. त्यामुळे नदीपात्रात उतरण्यासाठी घाट बांधून द्यावा. जेणेकरून नदीपात्रात स्वच्छताही राखता येईल, तसेच मुलांना खेळायला आणि अन्य वापरासाठी जागाही उपलब्ध होईल, अशी मागणी येथील नागरिकांची होती. त्यानुसार 2018-19 च्या अंदाजपत्रकात 10 लाख रुपयांची तरतूद केली होती. निविदा काढूनच याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम करत असताना एकही झाड तोडण्यात आलेले नाही. जेवढे काम होईल, तेवढेच बिल अदा केले जाणार आहे.
– जयंत भावे, स्थानिक नगरसेवक

अधिकारी मात्र निरुत्तर
डीपी रस्ता धोकादायक झाल्याने तसेच नदीपात्रात दलदलीमुळे डास होत असल्यामुळे स्वच्छता आणि मुलांना खेळण्यासाठी नदीपात्रात उतरता यावे यावे यासाठी माननीयांच्या मागणीनुसार घाटाचे काम करण्यात येत आहे. या पायऱ्यांमुळे नदी प्रवाहाला कुठलाही अडथळा येणार नाही. स्ट्रक्‍चरल इंजिनिअरकडूनच या घाटाचे डिझाईन तयार करून घेतले आहे. परंतू हा घाट पूररेषेत येतो का नाही, याची खातरजमा करण्यात आली की नाही, याची माहिती वारजे क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता राजेश टाले देऊ शकले नाहीत. वर्क ऑर्डर 8 लाख 67 हजार 23 रुपयांची आहे. आतापर्यंत 3 लाख रुपयांचे काम झाले आहे. जेवढे काम होईल, तेवढेच पैसे ठेकेदाराला दिले जाणार असल्याचा खुलासा टाले यांनी केला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×