पुणे : कर्मचाऱ्यांच्या उनाडगिरीला शिस्तभंगाचा लगाम

महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय : सेवा पुस्तकात होणार नोंद

पुणे : महापालिकेच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळी चहा तसेच गप्पा मारण्यासाठी महापालिकेच्या इमारतीबाहेर उनाडगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगाम घालण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. कार्यालयीन कामकाजाच्या वेळी कर्मचारी बाहेर गेल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्याची नोंद सेवा पुस्तकात केली जाणार आहे. तसेच अशा कर्मचाऱ्यांची माहिती ठेवण्याच्या सूचना सर्व विभाग प्रमुखांना कार्यालयीन आदेशाद्वारे देण्यात आल्या आहेत.

महापालिकेची शहरातील क्षेत्रीय कार्यालये तसेच महापालिकेच्या मुख्य इमारतीत सुमारे 17 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना जेवणाच्या सुट्टीसह कार्यालयानी कामकाजाची वेळ निश्‍चित करून देण्यात आली आहे. मात्र, अनेक कर्मचारी सकाळी कामावर उशिरा येणे, लवकर जाणे, दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत कार्यालयालाकडी लावून बसणे असे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे शहरभरातून वेगवेगळ्या कामांसाठी आलेल्या नागरिकांना कर्मचाऱ्यांची वाट पाहत तासन्‌तास ताटकळत राहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने मागील आठवड्यापासून सकाळी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. त्यानंतर आता कार्यालयीन कामकाजाच्या वेळी महापालिकेच्या आवारात फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सामान्य प्रशासन विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. हे कर्मचारी बाहेर जाताना त्यांना आता प्रत्येकवेळी हालचाल रजिस्टर मध्ये नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच जे कर्मचारी नोंदी न करता बाहेर जातील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असून त्याची जबाबदारी सर्व विभाग प्रमुखांवर निश्‍चित करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.