पुणे – कमला नेहरू डायलिसिस केंद्र बंद प्रकरण: लायन्स क्‍लबला महापालिकेची नोटीस

एकाचवेळी सहा मशीन बंद


रुग्णांची गैरसोय; ससूनसह शेठ ताराचंद रुग्णालयात सुविधा

पुणे – महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील 6 डायलिसिस मशीन्स कोणतीही पूर्व सूचना न देता बंद केल्याप्रकरणी महापालिकेकडून लायन्स क्‍लब ऑफ मुकुंदनगरला नोटीस बजाविण्यात आली असल्याची माहिती पालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली. दरम्यान, हे केंद्र बंद असल्याने रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ससूनसह शेठ ताराचंद धर्मादाय रुग्णालयातही पालिकेच्या दरानेच डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे डॉ. हंकारे यांनी स्पष्ट केले.

या ठिकाणी नियमितपणे डायलिसिससाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या 63 असून महिन्याला 500 रुग्णांचे याठिकाणी डायलिसिस होते. दहा दिवसांपासून ही यंत्रणा बंद पडल्याने नियमित येणारे गरीब कुटुंबांतील 2 रुग्ण अत्यवस्थ असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कमला नेहरू रुग्णालयामध्ये तीन वर्षांपूर्वी गरीब रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सुरू करण्यात आले. लायन्स क्‍लब ऑफ मुकुंदनगरच्या माध्यमातून हे केंद्र चालविलेजात आहे. मोफत सुविधेमुळे शहराच्या विविध भागांमधील गरीब रुग्णांचा ओघ वाढला आहे. परंतु, दहा दिवसांपूर्वी अचानक एकाचवेळी सर्व मशीन्स दुरुस्तीला नेतो असे सांगून नेण्यात आल्या आहेत. डायलिसिस ही अत्यावश्‍यक सेवा असताना ती अचानक बंद ठेवण्याने त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने बुधवारी तातडीने नोटीस बजाविली. कोणतीही पूर्वसूचना न देता देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली ही अत्यावश्‍यक सेवा बंद करणे ही महापालिका आणि लायन्स क्‍लबमध्ये करण्यात आलेल्या कराराचा भंग करणारी बाब असून तातडीने दुसऱ्या मशीन उपलब्ध करून डायलिसिस केंद्र सुरू करावे, अशा सूचना करण्यात आल्या असल्याचे डॉ. हंकारे यांनी स्पष्ट केले. तसेच लायन्स क्‍लबने केंद्र सुरू करण्याबाबत आश्‍वासन दिले असून त्यांच्याकडून लेखीपत्र मागण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडून हे केंद्र न सुरू केले गेल्यास करारनाम्यातील अटी आणि शर्ती तपासून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

शेठ ताराचंद रुग्णालयात देणार सुविधा
कमला नेहरू रुग्णालयात डायलिसिससाठी येणाऱ्या रुग्णांना ससून रुग्णालयासोबतच शेठ ताराचंद रुग्णालयातही डायलिसिस सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे डॉ. हंकारे यांनी सांगितले. ताराचंद रुग्णालयास महापालिकेकडून देणगी दिली जात असल्याने शहरी गरीब योजने अंतर्गत त्यांच्याशी आरोग्य सेवेबाबत महापालिकेचा करार झाला आहे. त्यानुसार, कमला नेहरू रुग्णालयात आकारण्यात येणाऱ्या दराप्रमाणेच 400 रुपयातच या रुग्णालयातही ही सुविधा दिली जाणार असून त्यासाठी रुग्णालय प्रशासनास पत्र पाठविण्यात आल्याचे ते म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)