पुणे – ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा

खरीप हंगामातील बाधितांसाठी 206.59 कोटी निधी


कोणत्याही प्रकारची थकबाकी वसुली होणार नाही

पुणे – सन 2018-19 च्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित पुणे विभागातील शेतकऱ्यांना पहिला हप्ता वाटप करण्यासाठी 206.59 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दिनांक 25 जानेवारीच्या शासन निर्णयानुसार 33 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना दोन किंवा तीन हप्त्यांत मदत वाटप करण्यात येणार आहे. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 6 हजार 800 रुपये प्रति हेक्‍टर या दराच्या 50 टक्के म्हणजेच 3 हजार 400 रुपये प्रति हेक्‍टर किंवा किमान एक हजार रुपये यापैकी अधिक असेल ती रक्कम शेती पिकांचे बाधित सर्व शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे.

ही मदत 2 हेक्‍टरच्या मर्यादेत व लागवड केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेपर्यंतच राहील. मदतीची रक्कम संबंधितांच्या बॅंक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. मदतीची रक्कम खातेदाराच्या बॅंक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रकमेमधून कोणतीही बॅंक कोणत्याही प्रकारची वसूली करणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे.

ही रक्कम वाटप करण्यात आलेल्या लाभार्थींची यादी त्यांना प्रदान केलेल्या माहितीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. 2018 च्या खरीप हंगामातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक व बॅंक खात्याशी संबंधीत सविस्तर माहिती शासनास सादर करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

पुणे विभागासाठी पहिला हप्ता वाटप करण्यासाठी जिल्हानिहाय निधी पुढील प्रमाणे आहे. एकुण मदतीची रक्कम रुपये कोटीमध्ये आहे. पुणे- 53.239808, सातारा- 21.36064, सांगली – 34.4064, सोलापूर- 97.593096 असा एकुण 206.599944 इतक्‍या रकमेचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.