पुणे – ‘एफआरपी’प्रश्‍नी कारखाने अखेर वठणीवर

 नोटीस जाताच सव्वातीन हजार कोटींची थकबाकी जमा

पुणे – उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरासाठी (एफअरपी) शेतकरी संघटनांनी केलेल्या आंदोलनानंतर राज्यातील साखर कारखान्यांनी गेल्या पंधरा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 3 हजार 297 कोटी 48 लाख रुपयांची थकबाकी जमा केली आहे. हंगाम सुरू झाल्यानंतर “एफआरपी’चे 8 हजार 464 कोटी 47 लाख रुपये मिळाले आहेत.

कायद्यानुसार शेतकऱ्यांना ऊस गाळपानंतर 14 दिवसांत “एफआरपी’ देणे बंधनकारक आहे मात्र, 31 डिसेंबरअखेरच्या गाळपाआधारे 185 कारखान्यांपैकी केवळ 11 कारखान्यांनी शंभर टक्के “एफआरपी’ रक्कम दिलेली होती. राज्यात 15 जानेवारीअखेरीस 5 हजार 320 कोटी 36 लाख रुपयांची थकबाकी होती. राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी “एफआरपी’साठी आंदोलन सुरू केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 27 जानेवारीला साखर आयुक्तालयावर हल्लाबोल आंदोलनही केले. त्यानंतर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी 39 साखर कारखान्यांना रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टीफिकेट (आरआरसी) बजावले. तसेच इतर कारखान्यांविरोधातही आरआरसी कारवाईची प्रक्रिया सुरू केली.

दरम्यान, राज्यातील अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांना “एफआरपी’ची रक्कम देण्यास सुरुवात केली. राज्यात 15 जानेवारीअखेरच्या गाळपानुसार 31 जानेवारी अखेरीस सुरू असलेल्या 190 साखर कारखान्यांकडे 13 हजार 305 कोटी 62 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्या पैकी 8 हजार 464 कोटी 47 लाख रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. केवळ पंधरा दिवसांत कारखान्यांनी 3 हजार 297 कोटी 48 लाख रुपयांचा भरणा केला आहे.

दरम्यान, शनिवारी 59 कारखान्यांची सुनावणी झाली. त्यापूर्वी या कारखान्यांनी 1 हजार 580 कोटी 14 लाख रुपये “एफआरपी’ दिली होती. सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यात आणखी 238 कोटी रुपयांची भर पडली. त्यातील 5 कारखान्यांनी 100 टक्के एफआरपी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.