पुणे -‘एफआरपी’चा टक्‍का अखेर ‘उतरणी’ला

एप्रिलअखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर 85 टक्के रक्कम जमा

पुणे – शेतकऱ्यांना देय असणाऱ्या “एफआरपी’ अर्थात रास्त आणि किफायतशीर किंमतीतील रक्कम यंदा प्रथमच कमी झाली आहे. एप्रिलअखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर 85 टक्के रक्कम जमा झाली आहे. “एफआरपी’चे 3 हजार 207 कोटी रुपये शेतकऱ्यांना अजूनही देणे असल्याची माहिती साखर आयुक्तालयाने दिली आहे. सन 2018-19 मध्ये प्रथमच “एफआरपी’च्या आकडेवारीमध्ये यंदा प्रथम घट झाली आहे.

एप्रिलअखेरीस राज्यात सुमारे 949 लाख टन उसाचे गाळप 195 साखर कारखान्यांनी पूर्ण केले आहे. त्यापोटी देय “एफआरपी’ची एकूण रक्कम सुमारे 22 हजार 42 कोटी रुपये होत असून, शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर त्यापैकी 18 हजार 821 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. साहजिकच थकीत “एफआरपी’चा आकडा हंगामात प्रथमच खाली येण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांना 15 टक्के म्हणजे सुमारे 3 हजार 607 कोटी रुपये अद्यापही मिळणे बाकी असून, ही रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ मिळण्यासाठी आयुक्तालयाकडून योग्य त्या उपाययोजना सुरू आहेत.

ताज्या अहवालानुसार, उसाच्या “एफआरपी’ची 100 टक्के रक्कम 43 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिलेली आहे. 80 टक्‍क्‍यांहून अधिक रक्कम देणारे 80 कारखाने असून, 60 ते 79 टक्के इतकी रक्कम 42 कारखान्यांनी दिली आहे. शून्य टक्के ते 60 टक्के रक्कम देणाऱ्या कारखान्यांची संख्या 30 आहे. त्यामुळे आयुक्तालयाच्या नियोजनानुसार, हंगामाअखेरीस एफआरपीची 10 टक्के रक्कमच शेतकऱ्यांना देणे बाकी राहील. यासाठी संबंधित कारखान्यांची वेळोवेळी सुनावणी घेऊन म्हणणे ऐकून घेतले असल्याचेही सांगण्यात आले.

उर्वरित रक्कमही लवकरच
गेल्या काही दिवसांपासून “एफआरपी’चे 4 हजार 324 कोटी रुपये शेतकऱ्यांना देणे बाकी होते. त्यापैकी कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर 717 कोटी रुपये जमा केले आहेत. त्यानुसार आता तीन हजार 607 कोटी रुपये अद्याप बाकी आहेत. केंद्राच्या कर्ज योजनेतून राज्यातील कारखान्यांना कर्ज मंजूर झाले आहे त्यामुळे ही रक्कम प्राप्त होताच थकीत “एफआरपी’चा आकडा आणखी कमी होईल

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.