पुणे -‘एचसीएमटीआर’ रस्त्यासाठीही “टीओडी धोरण’

महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव : पहिल्या टप्प्यातील काम लवकरच

पुणे – मेट्रो प्रकल्पापाठोपाठ शहराची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने प्रस्तावित केलेल्या हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रुट (एचसीएमटीआर) रस्त्यावर “बीआरटीएस’ प्रकल्प राबवण्यात येत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला 500 मीटर अंतरापर्यंत “टीओडी’ अर्थात ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंट धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाने शहर सुधारणा समितीसमोर ठेवला आहे. तो मंजूर झाल्यास रस्त्यासाठी आवश्‍यक सुमारे 6 हजार कोटी रुपयांचा निधी उभारणे शक्‍य होणार आहे. सुमारे 36 किलोमीटरचा हा मार्ग आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे महापालिकेची विकास नियंत्रण नियमावली (डीपीआर 2017) मंजूर करतेवेळी ट्रान्झिट ओरियंटल डेव्लपमेंटची तरतूद मान्य करण्यात आली आहे. याच तरतुदीनुसार महापालिका “बीआरटीएस’ आणि मेट्रोच्या प्रभावित क्षेत्रामध्ये “टीओडी झोन’ करू शकते. जागेच्या क्षेत्रफळानुसार चार चटई क्षेत्र (एफएसआय) मंजूर करुन प्रकल्पासाठी निधी उभारणे शक्‍य होणार आहे. या तरतुदींचा वापर पुणे मेट्रो प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे. त्यासाठीचा अंतिम प्रस्ताव राज्य शासनाकडे मान्यतेसाठी असून त्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्‍यता आहे. असे असतानाच; आता प्रशासनाने “एचसीएमटीआर’ रस्त्यासाठीही हा प्रस्ताव आणला आहे.

36 चौरस किलोमीटर क्षेत्राला होणार फायदा
महापालिकेच्या सन 1987 च्या विकास आराखड्यात हा रस्ता दर्शवण्यात आलेला आहे. यात बोपोडी, पुणे विद्यापीठ चौक, सेनापती बापट रस्ता, पौड रस्ता, कर्वे रस्ता, दत्तवाडी, सारसबाग, स्वारगेट. नेहरु रस्ता, लुल्लानगर, वानवडी, रामवाडी, मुंढवा, वडगावशेरी, विमाननगर चौक, विश्रांतवाडी असा हा मार्ग असणार आहे. सध्याच्या भूसंपादन अधिक गतीने होण्यासाठी प्रशासनाने मार्गामध्ये काही बदल केले आहेत. प्रकल्पाचा मार्ग तांत्रिकदृष्टया सबळ करण्यासाठी आणि रस्त्यावरील वाहनांचा वेग ताशी 50 किलोमीटर राहवा, यासाठी मार्गात काही बदल सुचवण्यात आले आहेत. तसेच हा मार्ग पूर्णत: उन्नत असणार आहे. त्यामुळे या मार्गाच्या दोन्ही बाजूस सुमारे 36 चौरस किलोमीटर क्षेत्रास या वाढीव “एफएसआय’चा फायदा होणार आहे. मात्र, त्या-त्या भागातील रस्त्यांच्या रुंदीनुसार, हा “एफएसआय’ 2 ते 4 च्या दरम्यान असणार आहे.

अशी आहे जमिनींची सद्यस्थिती
“एचसीएमटीआर’ रस्त्याचा मार्ग सध्या 17.75 किलोमीटर अस्तित्वातील रस्त्यावरून आहे. नदी-नाले व कालव्यावरुन 5.27 किलोमीटर, खासगी जागेमध्ये 7.58 किलोमीटर अशी एकूण 35.96 लांबीचा रस्ता आहे. याप्रकल्पासाठी एकूण 77.10 हेक्‍टर एवढे क्षेत्र आवश्‍यक आहे. त्यापैकी 37.63 हेक्‍टर क्षेत्र महापालिकेच्या ताब्यात आहे. महापालिकेला 23.29 हेक्‍टर खासगी भूसंपादन करावे लागणार आहे.15.78 हेक्‍टर जमीन ही राज्य शासनाच्या ताब्यात आहे. “एचसीएमटीआर’ प्रकल्पासाठी रेल्वे,पर्यावरण, सिंचन, संरक्षण, वन, विमानतळ प्राधिकरण इत्यादी अशा सर्व विभागांची मंजुरी घ्यावी लागणार आहे.

211 कोटींची तरतूद
पूर्णत: उन्नत असलेल्या या मार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम लवकरच प्रशासनाकडून सुरू केले जाणार असून त्यासाठी 2019-20 च्या अंदाजपत्रकात महापालिका आयुक्तांनी सुमारे 211 कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे. या शिवाय, डेव्हल्पमेंट क्रेडिट बॉन्डचा वापर प्रशासनाकडून केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)