पुणे – ‘एचसीएमटीआर’ मार्गाला येणार गती

शुक्रवारी दिल्लीत बैठक : नियोजनासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घातले लक्ष

पुणे – पुणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मात्र बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या 34 कि.मी.च्या “एचसीएमटीआर’ (उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग) प्रकल्पाला गति मिळण्याची चिन्हे आहेत. या रस्त्याच्या नियोजनासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लक्ष घातले असून 1 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये प्राथमिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी एका दशकापूर्वी “एचसीएमटीआर’ रस्त्याची आखणी केली आहे. शहराच्या उपनगरीय भागांतून आखण्यात आलेल्या या वर्तुळाकार मार्गिकेवर बीआरटीसह स्वयंचलित सार्वजनिक वाहतुकीचेही प्लॅनिंग करण्यात आले आहे. परंतु, या योजनेसाठी भूसंपादन आणि कामासाठी येणाऱ्या खर्चामुळे अनेकवेळा या प्रकल्पाबाबत चर्चा होवूनही नियोजनाच्या पातळीवर गती बेताचीच राहिली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये या रस्त्यासाठीच्या जागेची सद्यस्थिती आणि कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा अहवाल तयार करण्यासाठी मोनार्क या संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती. या संस्थेने पॅकेजेसमध्ये अगदी रस्त्याची आखणी, भूसंपादन आणि कामासाठी लागणारा निधी कसा उभारणार याचा सविस्तर अहवाल तयार केला आहे. दरम्यानच्या काळामध्ये सार्वजनिक वाहतूक सक्षमिकरणासाठी मेट्रोच्या दोन मार्गिका मंजूर झाल्या आणि प्रत्यक्षात कामकाजही सुरू झाले, त्यामुळेही “एचसीएमटीआर’ प्रकल्प थंड बस्त्यात गेला होता.

मुख्यमंत्र्यांचे प्रकल्पाला गती देण्याचे आश्‍वासन
नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “एचसीएमटीआर’ प्रकल्पाला गती देण्याचे आश्‍वासन दिले होते. तसेच केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनीही प्रकल्पाचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात त्यादृष्टीने कार्यवाहीही सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाने “एचसीएमटीआर’ प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी दिल्लीत बैठक बोलविली आहे. यासाठी आयुक्त सौरभ राव यांच्यासह अतिरिक्त आयुक्त बिपीन शर्मा, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरूद्ध पावसकर हे उपस्थित राहून प्रकल्पाचे सादरीकरण करणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)