पुणे – ‘एक्‍स्प्रेस वे’वरील दरडी हटविण्याचे काम लवकरच

महामार्ग पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांची माहिती

पुणे – वाहतुकीच्यादृष्टीने सर्वात वेगवान समजला जाणारा पुणे- मुंबई एक्‍स्प्रेस वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सुरक्षित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरडी कोसळून होणारे अपघात रोखण्यासाठी घाट माथ्यावरील दरडी हटविण्याचे काम येत्या काही दिवसांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबत संबंधित विभागाला सूचना करण्यात आल्या आहेत.

गेल्या काही वर्षांच्या कालावधीत या एक्‍स्प्रेस महामार्गावरील घाटातील दरडी कोसळल्याने अनेक छोटे-मोठे अपघात घडले आहेत. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या कालावधीत या दरडी कोसळण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यावर उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने दरडी काढण्याचे काम सातत्याने करण्यात येत आहे. विशेष म्हणजे वाहतुकीच्या संदर्भात महामार्ग पोलिसांचे चोख नियोजन असल्याने दरडी काढण्याच्या वेळीही या महामार्गावर फारशी वाहतूक कोंडी होत नाही. हे वास्तव असले तरीही या दरडी कोसळण्याचे प्रमाण अद्याप फारसे कमी झालेले नाही. त्यामुळे प्रशासन आणि महामार्ग पोलिसांची चिंता आणखीनच वाढत चालली आहे. त्यावर प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाच्या वतीने धोकादायक दरडी आणि ठिकाणांची पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार पंधरा दिवसांपूर्वी अमृताजंन पुलासह अन्य भागातील धोकादायक दरडी हटविण्यात आल्या होत्या. मात्र, त्यासाठी कमी कालावधी मिळाल्याने आणखी काही दरडी हटविण्यात आलेल्या नाहीत. त्यासंदर्भात प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत, आगामी काळात या दरडी हटविण्यात येणार आहेत. त्याची तारीख आणि कालावधी ठरविण्याचे काम प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. प्रशासनाने हे काम सुरू केल्यानंतर वाहतूक कोंडी होणार नाही. यासंदर्भात योग्य उपाययोजना करण्यात येणार आहे. या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती महामार्ग पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)