पुणे – एकत्र येऊ, शहरातील वाहतूक कोंडी फोडू

संग्रहित फोटो

वाहतूक विभाग आणि पालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

पुणे – शहरातील मुख्य रस्त्यावर सातत्याने वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी उपाय करण्यासाठी वाहतूक विभागाचे प्रयत्न सुुरू आहेत. यासाठी आता महापालिका प्रशासनाची मदत घेतली जात असून दोन्ही विभागांकडून सामूहिक प्रयत्नाव्दारे तातडीच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यासंदर्भात शनिवारी वाहतूक विभाग आणि पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. यामध्ये कामांना गती देण्याचे ठरले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या काही दिवसांपासून शहरातील वाहतुकीची समस्या जटील बनत चालली आहे. संततधार पावसामध्येही वाहतूक विस्कळीत होत असून पोलिसांसमोरही आव्हान उभे राहत आहे. मुख्यत्वे शहरातील सेनापती बापट रोड, जंगली महाराज रोड, टिळक रोड कर्वे रोड, सिंहगड रोड, सातारा रोड या रस्त्यावरील वाहतूक सातत्याने विस्कळीत होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक विभागाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून शनिवारी वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासन यांच्यात समन्वय बैठक पार पडली. बैठकीला अतिरिक्‍त पोलीस आयुक्‍त रवींद्र सेनगावकर, अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त शीतल उगले, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्‍त अशोक मोराळे, वाहतूक पोलीस उपायुक्‍त तेजस्वी सातपुते, पीएमपी अध्यक्षा नयना गुंडे आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये शहरात सुरू असलेली विविध विकासकामे व वाहतूक सुरळीत होण्यासाठी करावे लागणारे उपाय, यावर संबंधीत अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली.

शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्राधान्याने करावयाच्या कामांची यादी वाहतूक विभागाने पालिका प्रशासनाला दिली आहे. यामध्ये शहरातील विविध भागात बंद स्थितीत असलेले सिग्नल दुरुस्तीचे कामे, रस्त्यावरील खड्डे, रस्त्यावरील अडथळा ठरणारे बॉटल नेक्‍स, अतिक्रमण आदी कामे महापालिकेच्या विविध विभागाकडून केली जात असून ती लवकरात लवकर पूर्ण करावी, असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

अनेकदा सिग्नल बंद पडल्याने चौकांमध्ये वाहतूक विस्कळीत होते. मात्र, वाहतुकीचे नियमन करण्याचे काम वाहतूक पोलिसांचे असून ते दुरुस्त करण्याचे काम पालिका प्रशासनाचे आहे. यामुळे अशाप्रकारचे सिग्नल पालिका प्रशासनाने दुरुस्त करुन देण्याविषयी यावेळी चर्चा झाली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून सामूहिकरित्या वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्‍यक ते सर्व कामे लवकरात लवकर करण्याचे ठरले आहे.

महापालिकेच्या मदतीने ही कामे दृष्टीपथात
– शहरातील मुख्य रस्तांवरील खड्डे तातडीने बुजविणे
– बंद असलेले सिग्नल तत्काळ दुुरुस्त करणे
– ये- जा करण्यासाठी अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवणे
– काही महत्वाच्या सिग्नलचे सिंक्रोनोइझेशन
– अवैध पार्किंगवर, अनधिकृत पथारी व्यवसायावर कारवाई

दोन्ही प्रशासनाकडून समन्वय बैठक सुरू राहणार
शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभाग प्रयत्नशील आहे. मात्र, यासाठी महापालिका प्रशासनाची मदत लागणार असून दोन्ही प्रशासनाकडून प्रयत्न करणे गरजेचे आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारे अनेक कामे महापालिकेच्या विविध विभागाकडून केली जातात. यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दोन्ही प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येणार असून यासाठी यापुढेही समन्वय बैठक होणार आहे. यामध्ये केलेली कामे आणि करावी लागणारी कामे यासंबंधी चर्चा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)