पुणे – उपोषणातील दोघांची प्रकृती गंभीर

ससूनमध्ये दाखल; अन्नत्याग करीत उपोषण सुरूच

पुणे – स्थापत्य अभियांत्रिकी उमेदवारांचा विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सहाव्या दिवशी आमरण उपोषण सुरू आहे. यातील दोन उमेदवारांची प्रकृती खालावल्याने, त्यांना आज ससून रुग्णालयात हलविण्यात आले. या दोघांनीही ससूनमध्ये अन्नत्याग करीत आपले उपोषण सुरू ठेवले आहे. मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू राहण्याचा निर्णय उमेदवारांनी घेतला आहे. त्यामुळे स्थापत्य अभियांत्रिकी उमेदवारांच्या उपोषणाची दखल घेतली जाणार का? हेच आता पाहावे लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्य शासनाने सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण विभागाच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब पदाच्या 2 हजार, 175 जागांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी केवळ पदविकाधारक पात्र ठरविण्यात आले आहेत. वस्तुत: या पदांसाठी उच्चशिक्षित अभियांत्रिकीचे पदवीधारक (डिग्री होल्डर) मोठ्या संख्येने उपलब्ध असताना त्यांना यासाठी अपात्र ठरविण्यात आले. या पदांसाठी अभियांत्रिकी पदवी उमेदवारांचा समावेश व्हावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी उमेदवार विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.

राज्य शासनाने ही मेगा भरती 1970 साली तयार केलेल्या जुनाट नियमांनुसार कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब साठी फक्‍त पदवीकाधारक उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे. यामुळे उच्चशिक्षित उमेदवारांवर अन्याय होत आहे, असे उमेदवारांचे म्हणणे आहे. तसेच, एकूण सहा उमेदवार उपोषणाला बसले असून, त्यातील दोघांना यापूर्वीच ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना डिस्जार्च देण्यात आला. त्यानंतर आज उपोषणकर्त्या स्वप्निल खेडकर आणि स्वप्निल चौरे या दोघांची प्रकृती खालावली. त्यांना आज ससूनमध्ये दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्या अवस्थेतही त्यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे. विभागीय आयुक्‍त कार्यालयाच्या बाहेर निखिल तावस्कर आणि प्रवीण सस्ते यांनी मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, उपोषणकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने, त्याची दखल सामान्य प्रशासन विभागाला घ्यावी लागली. या विभागाचे उपायुक्‍त संजयसिंह चव्हाण यांनी दि. 29 जानेवारी रोजी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत हा प्रश्‍न मांडला जाईल. त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिष्यमंडळाची भेट घडून आणून हा प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन चव्हाण यांनी यावेळी उमेदवारांना दिले आहे.

चहाचा स्टॉल टाकून उपोषण
स्थापत्य अभियांत्रिकीच्या उमेदवारांनी विभागीय आयुक्‍त कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ चहाचा स्टॉल टाकून उपोषणास बसलेल्या उमेदवांराना पाठिंबा दर्शविला आहे. आम्हाला संधी देणार नसाल, तर उच्च शिक्षण घेऊन आम्ही चहाचे स्टॉल टाकायचे का? असा प्रश्‍न उपस्थित करीत उमेदवारांनी आपला संताप व्यक्‍त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)