पुणे – उपनगरांतही होणार “टीपी स्कीम’

केंद्र सरकारचा निर्णय : पुण्याचाही समावेश

पुणे – सुनियोजित विकासासाठी केंद्र शासनाने “अमृत’ योजनेअंतर्गत एरिया प्लॅन व टाउन प्लॅनिंग स्कीम प्रायोगिक तत्वावर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 25 शहरांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये पुणे महापालिकेचा समावेश आहे. या अनुषंगाने महापालिकेने शहराच्या उपनगरीय भागात “टीपी स्कीम’ राबविण्याचा निर्णय घेतला असून बुधवारी (दि.30) नगरसेवकांसाठी महापालिकेच्या जुन्या सभागृहात याचे सादरीकरण केले जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबद्दल महापौर मुक्‍ता टिळक म्हणाल्या, “गुजरातमध्येच नव्हे, तर देशभरात सर्वाधीक टीपी स्कीम असून याची यशस्वी अंमलबजावणी करणारे अहमदाबाद येथील सीईपीटी युनिव्हर्सिटीचे तज्ज्ञ आर्किटेक्‍ट व शहर नियोजनकार डॉ. बिमल पटेल हे सादरीकरण करणार आहेत. टीपी स्किममुळे परिसराचा सुनियोजित विकास होतो. याचा जागा मालकांनाही विकसनासाठी चांगला लाभ होतो. टीपी स्कीममुळे विकास होण्यापूर्वी रस्ते ताब्यात येउन विकसित होत असल्याने भविष्यातील अडचणी दूर होतात.

पुणे शहरात यापूर्वी डेक्कन येथील प्रभात रस्ता, पर्वती परिसरातील सहकारनगर आदी आठ ठिकाणी टीपी स्कीम राबविण्यात आल्या आहेत. 40 ते 50 वर्षांनंतरही तेथील अंतर्गत रस्ते आणि अन्य सुविधा सुसज्ज आहेत. मगरपट्टा सिटी, अमेनॉरा टाउनशीप, नांदेड सिटी या खाजगी संस्थांनी उभारलेल्या टीपी स्कीमही सर्व सोयींनी परिपूर्ण आहेत. याच धर्तीवर आधुनिक काळाच्या गरजा ओळखून शहराच्या उपनगरीय भागांमध्ये ज्या ठिकाणी जागेची उपलब्धता आहे, त्याठिकाणी टीपी स्किम राबविण्याचा विचार आहे. तुर्तास महापालिकेने फुरसुंगी, वडाची वाडी, होळकरवाडी येथे टीपी स्कीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. “अमृत’ योजनेअंतर्गत बालेवाडी, महमंदवाडी व अशाच उपनगरीय भागात टीपी स्कीम उभारण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज देशमुख याप्रसंगी उपस्थित होते.

टीपी स्कीमची आखणी व अन्य प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सव्वावर्षांची कालमर्यादा कायद्यानेच ठरवून दिलेली आहे. यासाठी “अमृत’ योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून एक कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती करण्यात येईल. उपनगरांच्या सुनियोजित विकासासाठी टीपी स्कीम महत्वाची भूमिका बजावेल.
– मुक्‍ता टिळक, महापौर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)