पुणे – उच्चशिक्षण संस्थाद्वारेच राष्ट्रनिर्माण : पंतप्रधान

विविध शैक्षणिक उपक्रमांचे पंतप्रधानांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे डिजिटल पद्धतीने उद्‌घाटन

पुणे – राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियानाच्या (रुसा) दुसऱ्या चरणातील योजनांद्वारे विकसित होणाऱ्या संस्था भारताच्या निर्माणासाठी आहेत. त्यावरून देश कोणत्या दिशेने जातोय हे स्पष्ट होते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.

“रुसा’च्या दुसऱ्या चरणातील देशभरातील विविध शैक्षणिक संस्था, विभाग व त्यातील शैक्षणिक उपक्रमांचे उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे डिजिटल पद्धतीने झाले. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या “रीसर्च पार्क’चा समावेश होता. या रीसर्च पार्कच्या विकासासाठी विद्यापीठाला “रुसा’कडून 15 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, माजी कुलगुरू डॉ. अरुण निगवेकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवारसह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी पंतप्रधानांनी देशाच्या विविध भागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. आपल्या भाषणात ते म्हणाले, “रुसा’मार्फत संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. “अटल टिंकरिंग लॅब’ हे त्याच दिशेने टाकलेले मुख्य पाऊल आहे. देशात जय जवान, जय किसान, जय विज्ञान याचबरोबर जय संशोधन असा नारा आज दिला जात आहे. त्याद्वारे नव्या उद्योजकांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळेच आज भारत चीन, अमेरिकापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा “स्टार्ट-अप’ उद्योजकांचा देश बनला आहे. संशोधनाला पाठबळ देण्यासाठी देशभरातून आतापर्यंत 15 हजारांपेक्षा जास्त “स्टार्ट-अप’ निवडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी निम्मे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दर्जाच्या शहरांमधील आहेत.

रोजगार क्षमता वाढविण्यासाठी रिसर्च पार्क सुरू
विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविण्याचे आव्हान पेलण्यासाठी विद्यापीठांना परंपरागत शिक्षणाच्या पलीकडे जाऊन विविध प्रयत्न करावे लागतील. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून विद्यापीठात रीसर्च पार्क फाउंडेशन सुरू करण्यात येत आहे. यामध्ये लालफितीचा अडथळा नसेल, याउलट उद्योगाद्वारे मार्गदर्शन-पाठबळ मिळवून देऊन नवउद्योजक निर्माण होतील यासाठी योग्य ते वातावरण रिसर्च पार्कच्या माध्यमातून निर्माण केले जाईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. करमळकर यांनी दिली.

स. प. महाविद्यालय येथील केंद्राचे उद्‌घाटन
शहरातील शिक्षण प्रसारक मंडळीच्या स. प. महाविद्यालय, सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्टस्‌ अॅन्ड कॉमर्स येथे “उद्योजकता, रोजगार आणि करिअर हब’ या केंद्राचे उद्‌घाटन पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे डिजिटल पद्धतीने केले. “रुसा’ अंतर्गत या दोन्ही महाविद्यालयांना 5 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. स. प. महाविद्यालय येथील केंद्राचे उद्‌घाटनप्रसंगी महापौर मुक्‍ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अॅड. सदानंद फडके, सदस्य केशव वझे, प्राचार्य दिलीप सेठसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे सिम्बायोसिस कॉलेजमधील केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर आणि प्राचार्य ऋषिकेश सोमण उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)