पुणे – ई-बसचा मुहूर्त हुकणार?

शहरात एकही बस दाखल झालीच नाही


सत्ताधाऱ्यांनी ठरविला होता 26 जानेवारीचा मुहूर्त

पुणे – स्मार्ट सिटीअंतर्गत खरेदी केल्या जाणाऱ्या इलेक्‍ट्रिक बसेसपैकी पहिल्या टप्प्यातील 25 बसेस येत्या प्रजासत्ताकदिनी शहरात धावतील, अशी घोषणा भाजप पदाधिकाऱ्यांनी केली होती. यासाठीची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. मात्र, गुरूवारी (दि.24 ) शहरात या बसेस दाखल झाल्या नसल्याने सत्ताधाऱ्यांचा हा मुहूर्त हुकणार, अशी चर्चा जोरात सुरू आहे. याला पीएमपी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडूनही दुजोरा देण्यात आला आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात टप्प्याटप्याने पाचशे ई-बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात 150, तर दुसऱ्या टप्प्यात 350 बसेस खरेदी करण्यास संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. यानुसार पहिल्या 150 बसेससाठी 18 सप्टेंबर 2018 रोजी निवीदा जाहीर करण्यात आली होती. यावेळी (9 मीटर लांबी) 25 बसेसाठीच्या आलेक्‍ट्रा या कंपनीच्या निवीदा मंजुर करण्यात आल्या. संबंधित कंपनीकडून बसखरेदी करण्याचे ठरले. या बसेस दि.26 जानेवारी रोजी शहरात धावतील, अशी घोषणा महापौर मुक्ता टिळक यांच्याकडूनही करण्यात आली होती. मात्र, अजूनर्यंत या बसेस शहरात दाखल झाल्या नसल्याने सत्ताधाऱ्यांच्या घोषणा हवेत विरल्याचे दिसून येते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

…ई-बस ट्रायल आणि मार्गनिश्‍चिती
शहरात दि. 26 जानेवारीला 25 ई-बसेस धावणार असल्याचे सांगण्यात आले. यासाठी दोन महिन्यांपूर्वी शहरातील विविध भागांत बसची ट्रायल घेण्यात आली. तसेच, संचलनासाठी पुण्यातील 4, तर पिंपरीतील 3 मार्गही निश्‍चित करण्यात आले आहेत.

भेकराईनगर, निगडीत चार्जिंग स्टेशन
25 पैकी 15 बसेस पुणे, तर 10 बसेस पिंपरी शहरात धावणार आहेत. दोन्ही शहरात चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. पुण्यासाठी भेकराईनगर डेपो, तर पिंपरीसाठी निगडी डेपोत चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

मुख्यमंत्र्याच्या हट्टामुळे उशीर?
26 जानेवारी रोजी शहरात 25 ई – बसेस धावणार असल्याचे सांगण्यात आले होते. यासाठीची सर्व प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. मात्र, राज्यातील कोणत्याच जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात ई-बसेस धावत नाहीत. यामुळे पुण्यातील सर्वात मोठा हा प्रकल्प आहे. परिणामी, याचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचा विचार प्रशासनासह सत्ताधारी पक्षाकडून सुरू आहे. याला प्रशासनातील अधिकाऱ्यांकडूनही दुजोरा देण्यात आला. यामुळे या बसेस दाखल होण्यास उशीर होत असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)