पुणे : इंधन दरवाढीची महापालिकेलाही झळ

सुनील राऊत 

महिन्याला 42 लाखांचा फटका


बहुतांश करामधून सवलत मिळत ही स्थिती

पुणे : पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने होणाऱ्या दरवाढीचा फटका महापालिकेसही बसला असून या दरवाढीमुळे महापालिकेस महिन्याला 42 लाखांचा फटका बसत आहे. विशेष म्हणजे महापालिका वाहनांसाठी आवश्‍यक असलेले हे इंधन थेट पेट्रोलियम कंपन्यांकडून घेतले जात असल्याने पालिकेस बहुतांश करामधून सवलत मिळत असतानाही; या दरवाढीमुळे महापालिकेची चांगलीच कोंडी झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या ताफ्यात 1,109 डिझेलवरील तर 99 पेट्रोलवरील वाहने आहेत. महापालिका अधिकारी, नगरसेवक, तसेच दैनंदीन प्रशासकीय कामकाजासाठी ही वाहने वापरली जातात. त्यामुळे डिझेल वाहनांसाठी महिन्यांला 2 लाख 28 हजार डिझेल पालिकेला लागते; तर 12 हजार लिटर पेट्रोल लागते. हे पेट्रोल महापालिका थेट पेट्रोलीयम कंपन्यांकडून बल्कने खरेदी करते. तसेच महापालिका शासकीय संस्था असल्याने पालिकेला काही करांमध्ये सवलती मिळतात. त्यामुळे खुल्या बाजारातील किंमती पेक्षा पालिकेला कमी दरात पेट्रोल आणि डिझेल मिळते. मात्र, वारंवार होणाऱ्या इंधनाच्या दरवाढीमुळे महापालिकेचीही आर्थिक कोंडी झाली असून दरमहिन्याला इंधनाचा खर्च वाढतच असल्याचे चित्र आहे.

महापालिकेस एप्रिल 2017 मध्ये डिझेल 58 रुपये 30 पैशांना मिळत होते; तर तेच एप्रिल 2018 मध्ये 63 रुपये 91 पैसे तर मे 2018 मध्ये आता 67 रुपये 30 पैसे झाले आहे. त्यामुळे महापालिकेचा डिझेलचा खर्च गेल्या वर्षभरात 9 रुपयांनी वाढला आहे. अशीच अवस्था पेट्रोलची आहे. महापालिकेस एप्रिल 2017 मध्ये पेट्रोल 69 रुपये 50 पैशांना मिळत होते. तेच पेट्रोल एप्रिल 2018 मध्ये 76 रुपये 82 पैसे तर मे 2018 मध्ये 79 रुपये 19 पैसे प्रती लिटर दराने खरेदी करावे लागत आहे.

महिन्याला अर्धा कोटींचा भुर्दंड
इंधन दरवाढीमुळे महापालिकेस महिन्याला 45 ते 50 लाखांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. एप्रिल 2017 मध्ये महापालिकेस महिन्याला 12 हजार लिटर पेट्रोलसाठी 8 कोटी 34 लाख 12 हजार रुपये मोजावे लागत होते. हाच खर्च एप्रिल 2018 मध्ये 9 लाख 21 हजार 900 रुपयांवर पोहोचला आहे; तर मे 2018 मध्ये हा खर्च 9 लाख 70 हजारांवर गेला आहे. म्हणजेच महापालिकेस पेट्रोलपोटी मागील वर्षांच्या तुलनेत दीड ते 2 लाखांनी वाढला आहे. अशीच स्थिती डिझेलचीही आहे.

पालिकेस महिन्याला 2 लाख 28 हजार लिटर डिझेल सरासरी लागते. त्यासाठी एप्रिल 2017 मध्ये 1 कोटी 13 लाख 26 हजार रुपयांचा खर्च होता. तो एप्रिल 2018 मध्ये 1 कोटी 45 लाख 73 हजारांवर गेला आहे; तर तोच खर्च मे 2018 मध्ये 1 कोटी 55 लाख 44 हजारांवर गेला आहे. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत डिझेलचा खर्च 45 हजारांनी वाढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)