पुणे : आरोग्य सेवेचे वाभाडे

संग्रहित छायाचित्र

महापालिका मुख्यसभा 


सुविधांसाठी ‘न’चा पाढा


नगरसेविकांचा हल्लाबोल; 518 जागा रिक्‍त

पुणे – महापालिकेच्या आरोग्य विभागावर सर्वपक्षीय सदस्यांनी सोमवारी मुख्यसभेत हल्लाबोल केला. महापालिका रुग्णालयात अनेक यंत्रणा नाहीत, असतील तर ते चालवणारे तंत्रज्ञ नाहीत, अतिदक्षता विभाग नाही, प्रसुतीसाठी पुरेशी साधन-सामुग्री नाही, मनुष्यबळाचा अभाव, असलेल्या मनुष्यबळाची निष्क्रियता असे अनेक प्रश्‍न सदस्यांनी मांडले.

शुभांगी जानकर या विवाहितेचा आणि तिच्या बाळाचा प्रसूतिदरम्यान झालेल्या मृत्युचा मुद्दा पुन्हा एकदा मुख्यसभेत चर्चिला गेला. त्यावरून आरोग्य सेवेचे वाभाडे अनेक नगरसेवकांनी काढले. वासंती जाधव, नंदा लोणकर, प्रसन्न जगताप, रेखा टिंगरे, अश्‍विनी कदम, नीलिमा खाडे, आरती कोंढरे, राजश्री नवले यांनी आरोग्य सेवेसंदर्भात अनेक तक्रारी केल्या.

जानकर प्रकरणाची क्‍लिनिकल आणि “माता मृत्यु अन्वेषण समिती’ मार्फतही चौकशी केली आहे. तसेच संबंधित रुग्णालयातील स्टाफ आणि अन्य डॉक्‍टरांचीही चौकशी करण्यात आल्याचा खुलासा मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांनी दिली. शुभांगी जानकर या महिलेचा आदल्या दिवशी बीपी वाढला होता.

त्याचवेळी डॉक्‍टरांनी तिला ऍडमिट करून घेणे आवश्‍यक होते. मात्र, तसे झाले नसल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. त्यामुळे आदल्यादिवशी कामावर असलेल्या डॉक्‍टर आणि नर्स यांची बढती थांबवण्याची कारवाई केली आहे. महापालिका रुग्णालयांत एकूण 518 जागा रिक्त आहेत. त्यातील काही जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार असल्याचे डॉ. साबणे यांनी सांगितले.

भूलतज्ज्ञ नसल्याने अनेकदा शस्त्रक्रियेसंबंधी प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे काही डॉक्‍टरांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच राजीव गांधी रुग्णालय, दळवी हॉस्पिटल, कमला नेहरू आणि सोनवणे रुग्णालय येथे रिफ्रल पुढील वर्षापर्यंत सुरू होणार आहे. तसेच लहान मुलांसाठी चार “एनआयसीयू’ सुरू होणार असून, सोनवणे आणि येरवडा या दोन रुग्णालयांमध्ये 2 मे रोजी उद्‌घाटन होणार आहे. उरलेले दोन एनआयसीयु दोन सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे डॉ. साबणे म्हणाल्या.

रिक्त जागा भरण्यासाठी पाठपुरावा : महापौर
अग्निशमन आणि आरोग्य या अत्यावश्‍यक सेवांमधील रिक्त जागांसाठी राज्य सरकारकडे वारंवार पत्रव्यवहार सुरू असून आम्ही पाठपुरावा करत आहोत, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सभागृहात स्पष्ट केले. त्याबाबत लवकरच राज्यसरकारकडून परवानगी मिळेल, असेही महापौर म्हणाल्या.

‘त्या’खेळाडूंना नोकरीत समाविष्ट करणार

पुण्यातील सर्वच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना महापालिका नोकरीत समाविष्ट करून घेण्याचा प्रस्ताव सोमवारी मुख्यसभेत मंजूर करण्यात आला. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त सायकलपटू दीपाली शिळदणकर हिला महापालिका नोकरीत सामावून घेण्याचा प्रस्ताव मुख्यसभेत मंजुरीसाठी आला होता. अन्य शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंनाही यामध्ये समाविष्ट करून घ्यावे, अशी उपसूचना यावेळी सदस्यांनी दिली. त्या उपसूचनेसह हा विषय मुख्यसभेत मंजूर करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)