पुणे – आरटीओ कर्मचाऱ्यांकडून आज कामबंद आंदोलन

विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधणार

पुणे – राज्य परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचा कर्मचारी आकृतीबंध व कार्यालयीन रचना या समान महत्त्वाच्या विविध मागण्या प्रशासन स्तरावर प्रलंबित आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य प्रादेशिक परिवहन कार्यालय कर्मचारी संघटनेच्यावतीने शुक्रवारी (दि.1) राज्यभरात कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.

राज्य परिवहन विभागात सद्यस्थितीत अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी एका कर्मचाऱ्याकडे किमान दोन ते तीन कर्मचाऱ्यांचा कार्यभार देण्यात आला आहे. पदोन्नतीकरीता असलेले चार स्तर कमी करण्यात यावेत व वर्ग “ब’ची पदे वाढवून मिळावीत, अशी मागणी संघटनेकडून वेळोवेळी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात कर्मचाऱ्यांकडून ऑक्‍टोबर-2018 मध्ये काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले होते. तसेच, 3 जानेवारी 2019 रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले. आजवर कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांकडून सनदशीर मार्गाने लढा सुरू असून त्यास प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. परिणामी या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय व्हावा या मागणीसाठी राज्यभरातील आरटीओ कर्मचाऱ्यांकडून लेखणी बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. यात पुणे कार्यालयासह पिंपरी-चिंचवड, बारामती, सोलापूर, अकलूज कार्यालयातील कर्मचारी सहभागी होणार असल्याचे संघटनेचे पुणे विभाग अध्यक्ष जगदीश कांदे यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी मागण्यांचे निवेदने प्राप्त झाली आहेत. यासंदर्भात गुरुवारी काही प्रतिनिधींशी चर्चाही करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या जाणून घेण्यात आल्या असून यावर सकारात्मक विचार सुरू आहे. जनतेला त्रास होईल अशा प्रकारचे आंदोलन कर्मचाऱ्यांनी टाळावे.
– सतीश सहस्त्रबुध्दे, अप्पर परिवहन आयुक्त, परिवहन विभाग, मुंबई

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×