पुणे – आरटीओकडून 105 ट्रॅव्हल्सचालकांना मेमो

 नियमभंग करणाऱ्यांवर वायुवेग पथकांची कारवाई

पुणे – मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करत प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या बेशिस्त ट्रॅव्हल्स चालकांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वायुवेग पथकाने कारवाईचा दणका दिला आहे. पथकाने 24 जानेवारीपासून शहरातील विविध ठिकाणी 272 ट्रॅव्हल्सची तपासणी करत 105 वाहनचालकांना मेमो दिला आहे. तर कर आणि तडजोड शुल्कापोटी 14 लाख 15 हजारांची वसुली करण्यात आली आहे. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रशेखर चव्हाण यांनी दिली आहे.

ट्रॅव्हल्सचे फिटनेस नसणे, टपावरून मालवाहतूक करणे, जादा प्रवाशांची ने-आण करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर आरटीओच्या वायुवेग पथकाकडून गुरुवारपासून (दि.24) धडक कारवाई सुरू करण्यात आली. यासाठी सोलापूर, बारामती, अकलूज कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली. या पथकांकडून सोलापूर रस्ता, नगर रस्ता, सातारा रस्ता, नाशिक आणि मुंबई रस्तादरम्यान मोहीम राबविण्यात आली होती. या विशेष मोहिमेत 88 वाहनांना अटकाव करण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, विनोद सगरे, आनंद पाटील, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रशेखर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

एसटीच्या 19 कर्मचाऱ्यांची मदत
वाहतूक नियमभंग करणाऱ्या ट्रॅव्हल्सचालकांच्या तपासणीसाठी एसटी महामंडळाच्यावतीने 19 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. कर्मचाऱ्यांनी आरटीओच्या वायुवेग पथकाला बस तपासणीसाठी मदत केली.

वाहनाचे फिटनेस, जादा प्रवासी संख्या, टॅक्‍स यासंबंधी बाबींची तपासणी करण्याकरीता सहा वायुवेग पथकांची निर्मिती करण्यात आली होती. पथकांच्या माध्यमातून तब्बल 272 खासगी ट्रॅव्हल्स तपासण्यात आल्या. तर, यातील 105 ट्रॅव्हल्सचालकांना मेमो देण्यात आला आहे.
– चंद्रशेखर चव्हाण, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.