पुणे: आता ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू होणार

राज्यातील एकमेव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला संधी

पुणे – गेली दोन राष्ट्रीय मानांकनात पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये स्थान मिळविणाऱ्या व नॅक मूल्यांकनात 3.26 पेक्षा अधिक गुण मिळवाणाऱ्या विद्यापीठांना त्यांच्या स्तरावर ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे या सर्व निकषात राज्यातील एकमेव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ही संधी मिळणार आहे. त्यामुळे आता कोणत्याही शिखर संस्थाची मान्यता न घेता पुणे विद्यापीठाला ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करता येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून गेल्या चार दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत विद्यापीठांना ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्याची मुभा दिली आहे.
ऑनलाईन अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देण्याचे धोरण मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यापूर्वीच स्वीकारले आहे. त्यानुसार आता विद्यापीठांनाही त्यांचे पदवी, पदविका अभ्यासक्रम ऑनलाईन स्वरुपात सुरू करता येतील. सध्या विद्यापीठात नियमित सुरू असलेलेच अभ्यासक्रम ऑनलाईन सुरू करता येणार आहेत. मात्र, प्रात्यक्षिके किंवा प्रयोगशाळेतील अनुभवाचा समावेश असणारे म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान शाखेचे अभ्यासक्रम सुरू करता येणार नाहीत, असेही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ऑनलाईन अभ्यासक्रमाचे स्वरुप हे ध्वनीचित्रीत अर्थात व्हिडिओ, ई-साहित्य, स्वयमूल्यामान स्वरुपातील परीक्षा असे असेल, असेही नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रणालीकडून (नॅक) कमीत कमी 3.26 आणि जास्तीत जास्त 4 पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्यांना विद्यापीठांना हे अभ्यासक्रम सुरू करता येणार आहे. तसेच गेली दोन वर्षे राष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या शंभर विद्यापीठात स्थान मिळविणारी विद्यापीठे ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करू शकतील. या सर्व निकषात सध्या राज्यातील फक्‍त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठालाच ही संधी मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

राष्ट्रीय क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गेल्या वर्षी दहावे, तर यंदाच्या वर्षी नववे स्थान मिळविले आहे. त्याचप्रमाणे नॅक मूल्यांकनाकडून पुणे विद्यापीठाला 3.60 गुण मिळाले आहे. या दोन्ही निकषात पुणे विद्यापीठ पात्र ठरले आहे. एवढेच नव्हे तर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून पुणे विद्यापीठाला स्वायत्तता दर्जा मिळाला आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता पुणे विद्यापीठाला ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यास कोणतीही अडचण उद्‌भवणार नसल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)