पुणे – आंबा पिकविण्यासाठी गैरमार्ग नकोच

थेट कारवाई करण्याचा प्रशासनाचा इशारा : व्यापारी आणि अधिकाऱ्यांची संयुक्‍त बैठक

पुणे – मार्केट यार्डातील फळ विभागात येत्या काही दिवसांत हापूस आंब्याची आवक वाढणार आहे. फळबाजारातील व्यापाऱ्यांनी आंबा पिकवण्यासाठी “इथेपॉन’ या रासायिनक पदार्थाचा वापर करावा. याशिवाय आंबा पिकविण्यासाठी अन्य गैर मार्गांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न आणि औषध प्रशासन विभागा (एफडीए)कडून देण्यात आला आहे.

आंबा पिकवण्यासाठी फळबाजारातील व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते संघटनेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी आणि आंबा व्यापाऱ्यांची बैठक नुकतीच मार्केट यार्डात आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी सहायक आयुक्त उ. वि. इंगवले, आडते संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष युवराज काची, सचिव रोहन उरसळ, अमोल घुले तसेच अन्य आंबा व्यापारी उपस्थित होते.

या बैठकीत आंबा व्यापाऱ्यांना “एफडीए’कडून सूचना देण्यात आल्या. आंबा पिकवण्यासंदर्भातील उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली. उरसळ म्हणाले, इथेपॉन पावडरच्या पुड्या आंब्याच्या खोक्‍याजवळ ठेवल्यास आंबा पिकतो तसेच गॅसचेंबरमध्ये आंबा पिकविला जातो. मात्र, बाजार समितीच्या आवारात अशा प्रकारची सुविधा नाही. काही व्यापाऱ्यांचे स्वत:चे गॅसचेंबर (वायुपेटी) आहे. ज्या प्रमाणे केळी पिकविली जातात. त्याप्रमाणे आंबा देखील पिकविला जातो. नैसर्गिक पद्धतीने देखील आंबा पिकविला जातो. मात्र, आंबा पिकवण्यासाठी कार्बाइडचा वापर करणे अयोग्य आहे.

“एफडीए’ने दिलेल्या सूचना
फळे पिकवण्यासाठी फळांची जात तसेच परिपक्वतेनुसार एथेलिन वायू तसेच पावडर स्वरूपात फळांच्या प्रत्यक्ष संपर्कात न आणता पुड्यांमध्ये (सॅचेट) “इथेपॉन’ हा रासायनिक पदार्थ वापरण्यास कायद्याने परवानगी देण्यात आली आहे. मानवी आरोग्याच्या दृष्टीने अन्य रासायनिक पदार्थांचा वापर करण्यास कायद्याने मनाई करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 मधील तरतुदींनुसार कॅल्शियम कार्बाइड, ऍसेटिलिन वायूचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचा वापर केल्यास कायद्यातील कलम 59 नुसार संबंधित व्यक्ती शिक्षेस पात्र ठरेल, अशा सूचना “एफडीए’चे सहायक आयुक्त उ. वि. इंगवले यांनी बैठकीत दिल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.