पुणे – अम्मा भगवानांच्या नावे 300 भाविकांना गंडा

भाविकांना दर्शन तसेच मंदिर बांधण्याच्या नावे पैशांची लुटमार


पिंपळे गुरव परिसरातील प्रकार पोलिसांच्या नावे उधळला

पुणे – “चेन्नई येथील अम्मा भगवान या भाविकांना दर्शन देण्यासाठी फलटण येथे येणार असून तेथे त्यांचे 118 एकर जागेत मंदिर बांधवयाचे आहे,’ अशी बतावणी करत पुण्यातील अम्मा भाविकांकडून लाखो रुपये गोळा करण्यात आले. त्यानंतर सुमारे 300 भाविकांना फलटण येथे नेऊन त्याठिकाणी अम्मा भगवान यांच्यासारखे कपडे परिधान करुन व चेहऱ्याला भस्म लावलेली डमी व्यक्ती उभी करण्यात आली. याप्रकारे मंदिर बांधण्याचे नावाखाली दिशाभूल करुन पैसे उकळण्याचा प्रकार जानेवारीत घडला आहे. असाच प्रकार पिंपळेगुरव येथील निळू फुले नाट्यगृहात करण्यात येत असलेला कार्यक्रम पोलिसांच्या हस्तक्षेपाने उधळून लावण्यात आलेला आहे.

यासंर्दभात अम्मा भगवानचे भक्त प्रमोन मेनन म्हणाले, “सातारा जिल्हयातील फलटण येथे घडलेल्या प्रकरणात सीमा अनंत तुपे (रा.हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयश्री भोसले (33), विठ्ठल सोनवणे (58), संगीता सोनवणे (50),विकास ढोले (49), मुकुंद वामने (66) व मिलिंद डांगरे (वय-40) या व्यक्तींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना नुकतेच फलटण पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपी विठ्ठल सोनवणे हे खडकीतील ऍम्युनेशन फॅक्‍टरीत ऑडिट विभागात तर त्याचा पत्नी संगीता कॉसमॉस बॅंकेत नोकरीस आहे.

फिर्यादीनुसार, “डिसेंबर 2018 मध्ये मुकुंद वामने माझ्या घरी आले व त्यांनी सांगितले, की अम्मा भगवान यांच्या पादुकांवर हात ठेवून शपथ घ्या, तुम्ही कोणाला सांगणार नाही पण अम्मा भगवान प्रत्यक्षात येणार आहेत. तसेच त्यांचे मंदिर बांधायचे असल्याने जमीन खरेदी केलेली आहे. त्याकरिता तुम्ही मदत करा. त्यानंतर पुन्हा त्यांनी फोन करुन अम्मा भगवान यांचे दर्शनासाठी फलटणला निघायचे असून हडपसर येथून बसची व्यवस्था केल्याचे सांगितले. त्याप्रमाणे मी त्याठिकाणी गेले असता चार लक्‍झरी बसमध्ये प्रत्येकी 50 असे 200 लोक तसेच इतर गावांवरुन आलेले असे एकूण 300 जण पहाटेच्या सुमारास निघालो. आम्हाला प्रत्येकाला आय-कार्डसाठी फी म्हणून 500 रुपये घेण्यात आले. तसेच सर्व लोकांचे मोबाइल, पर्स, डायरी, कॅमेरा, वही आयोजकांनी जमा करुन घेतली. फलटण येथे सजाई गार्डन याठिकाणी अनेक बाऊंसर उभे करण्यात आले होते व त्याठिकाणी अम्मा भगवान यांची मूर्ती व कलशदेखील ठेवण्यात आला. त्यानंतर आयोजक त्याठिकाणी वेगवेगळे ग्रूप करुन लोकांना सांगत होते. याठिकाणी जागा मंदिर बांधण्यासाठी घेतली असून त्याकरिता मदत करा. त्यानुसार 21 हजार रुपये मी रोख मुकुंद वामने यांचेकडे दिले. तसेच इतर लोकांनीही पैसे मंदिर बांधण्यास दिले. त्यानंतर सायंकाळी सात वाजण्याचे सुमारास भगवान आता येणार आहे, असे सांगण्यात आले व श्री भगवानयांचे सारखे कपडे घाललेली वाकत चालेलेले चेहऱ्याला भस्म लावलेली व्यक्ती त्याठिकाणी आली. यावेळी अम्मा त्यांच्यासोबत नव्हत्या. संबंधित व्यक्तीला पाहताच मला ती व्यक्ती भगवान नसल्याचे समजल्याने जोरात ओरडून ती “डमी’ व्यक्ती आहे, असे बोलताच संबंधित व्यक्तीला गाडीत बसून नेण्यात आले. त्यानंतर माझ्यासह इतरांना शपथ घेण्यास लावली, की या कार्यक्रमाबद्दल कोण बाहेर बोलणार नाही व जर सांगितले तर अडचणीत येणार.’

अम्मा भगवान फाउंडेशनचा संबंध नाही
फलटण येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने आरोपींनी 60 ते 70 लाख रुपये लुटले आहे. तपास अधिकारी वृषाली देसाई यांनी घटनेची चौकशी केली असता अम्मा भगवन ट्रस्टचा सदर गोष्टीशी संबंध नसल्याचे उघडकीस आले आहे. अशाचप्रकारे पुण्यातील पिंपळेगुरव परिसरात निळू फुले नाटयगृहात कार्यक्रमाची पुनरावृत्ती केली जात असताना अम्मा भगवान फाउंडेशनच्या ट्रस्टी अस्मिता राव, संगीता भिसे, ऍड. वसंत पाठील, रुपाली फलटणे, आदित्य महाडिक यांनी पोलिसांच्या मदतीने पूर्वनियोजीत “डमी’ अम्मा भगवानांच्या दर्शनाचा कट उधळून लावला. त्यामुळे अम्मा भगवानांच्या नावाखाली अनाधिकृत व्यक्तींद्वारे कोणतेही गैरकृत्ये होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरीत पोलीसांकडे तक्रार करा, असे आवाहन प्रमोद मेनन यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.