पुणे – अध्यासनांचे शैक्षणिक लेखापरीक्षण करावे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : अधिसभा सदस्यांची मागणी

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 17 अध्यासनांसाठी गेल्या वर्षभरात 34 लाखांचा खर्च करण्यात आला आहे. परंतु या अध्यासनांचे शैक्षणिक लेखापरीक्षण करण्यात आलेले नाही. या अध्यासनांमधून नेमके काय कार्य चालते याची माहिती व्हावी, तसेच अध्यासनांचे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे, यासाठी अध्यासनांचे शैक्षणिक लेखापरीक्षण करावे, अशी मागणी अधिसभा सदस्यांनी केली.

काही अध्यासने अनेक महाविद्यालयांमध्ये उपक्रम घेतात; तसे उपक्रम सर्वच अध्यासनांनी घ्यावेत. अध्यासनाचे प्रमुखपद घेणाऱ्या व्यक्तीने अतिरिक्त जबाबदारी घेऊ नये. अन्य जबाबदारी घेतल्यामुळे प्रमुखाला अध्यासनाला न्याय देता येत नाही. अध्यासन प्रमुखांनी सातत्याने विद्यापीठात यावे, अशा प्रकारच्या मागण्या अधिसभा सदस्यांनी केल्या.

या संदर्भात कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, “मी ज्यावेळी पदभार स्वीकारला त्यावेळी कोणत्याही अध्यासनाला प्रमुख नव्हता. मी आल्यानंतर सर्व अध्यासन प्रमुखांच्या नियुक्‍त्या केल्या. अध्यासनाचे नाव कोणतेही असले, तरी त्या नावानेच अध्यासनामध्ये कार्य चालते असे नाही.’

तर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले, “अध्यासनांचे काम उत्तमरित्या सुरू आहे. दर सहा महिन्यांनी अध्यासनांमध्ये सुरू असलेल्या कार्याचा अहवाल मला सादर करण्यात येतो. यावरदेखील अधिसभा सदस्यांचे समाधान झाले नसून त्यांनी “अध्यासनांचे शैक्षणिक लेखापरीक्षण कराच’ अशी मागणी केली आहे. त्यानंतर कुलगुरूंनी पुढच्या अधिसभेत अध्यासनाचा लेखाजोखा अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन दिले.

कशासाठी व्हावे लेखापरीक्षण?

विद्यापीठात 17 अध्यासने आहेत. परंतु त्यांच्या माध्यमातून फारसे कार्य होताना दिसत नाही. त्यांच्यावर होत असलेल्या खर्चाची माहितीदेखील मिळत नाही. तसेच विद्यापीठात महात्मा गांधी अध्यासन, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन, स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन अशा नावांनी अध्यासने आहेत. परंतु त्या ठिकाणी संबंधित महापुरुषांच्या नावाने कोणतेही कार्यक्रम राबवले जात नसल्याचे अधिसभा सदस्यांनी निदर्शनास आणले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.