पुणे – अंगणवाड्यांतील परसबागा पुन्हा फुलणार

पुणे – अंगणवाड्यांतील मुलांना पौष्टिक आहार मिळावा तसेच फळ, फुले आणि झाडे यांची माहिती व्हावी यासाठी अंगणवाडी परिसरात परसबागा तयार करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने यावर्षीही हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. अंगणवाडी परिसरात या परसबागा तयार करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी दिली.

जिल्ह्यात 4 हजार 623 अंगणवाड्या आहेत. गतवर्षी एक हजारांहून अधिक अंगणवाड्यांमध्ये लोकसहभागातून परसबागा तयार करण्यात आल्या होत्या. मात्र, उन्हाळ्यातील पाणी टंचाईमुळे या परसबागा कोमेजून गेल्या होत्या. त्यामुळे यावर्षी जून महिन्यातच या परसाबागा तयार करण्यात येणार असून विविध फळ, फुले आणि झाडे लावण्यात येणार आहेत. महिला व बालकल्याण विभागाकडून सेविकांना दिलेल्या प्रशिक्षणानुसार या परसबागा तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी लोकसहभाग असणार आहे. ज्या अंगणवाडी शाळेसमोर जागा उपलब्ध नसेल, त्याठिकाणी सेविका यांच्या घरासमोर किंवा अन्य ठिकाणी ही परसबाग तयार करण्यात येणार आहे. या बागेमध्ये टोमॅटो, वांगी, भेंडी, भोपळा, काकडी यासह विविध फळभाज्या लावण्यात येणार आहेत. महिला आणि बालकल्याण विभागाअंतर्गत जिल्ह्यात अंगणवाड्या चालवल्या जातात.

महिला व बालकल्याण विभागाचा उपक्रम
या अंगणवाड्यांमध्ये शाळेचा पहिला धडा घेण्यासाठी येणाऱ्या बालकांना पौष्टिक आहार मिळावा, फळ आणि फुलभाज्या कसे दिसतात, त्याला काय म्हणतात याबाबत माहिती व्हावी यासाठी जिल्हा परिषदेकडून अभिनव उपक्रम सुरू केल्याचे दीपक चाटे यांनी सांगितले. या परसबागेतून तयार झालेल्या भाज्या, फळ यांचा वापर मुलांना पौष्टिक आहार मिळण्यासाठी करण्यात येणार आहे. परसबाग तयार केल्यानंतर अंगणवाडी सेविका या परसबागेची पाहणी करणार असल्याचे चाटे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.