पुणेकरांची पसंती मिळवलेली योजना ‘कोकणात’

“न्याहारी आणि निवास’ची 289 केंद्रे विभागात होणार सुरू

पुणे – पुण्यात ज्या मोहिमेचा शुभारंभ होतो, तोच प्रयोग देशातच नव्हे तर राज्यात केला जातो. अशी म्हण प्रचलित आहे. हीच म्हण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सार्थ करून दाखवली आहे. महामंडळाने पुण्यात सुरू केलेला “न्याहारी आणि निवास’ ही योजना राज्यातील अन्य विभागातही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कोकण विभागात या योजनेची सुरुवात प्रजासत्ताक दिनी करण्यात आली. पहिल्याच टप्प्यात 289 केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्या तुलनेत सवलतीच्या दरात उपलब्ध होणारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची निवासस्थाने उपलब्ध नाहीत. त्याचाच गैरफायदा घेत अनेक खासगी हॉटेल चालक अव्वाच्या सव्वा दर आकारत होते. त्याचा आर्थिक फटका पर्यटकांना सहन करावा लागत होता. त्यामुळे महामंडळांने त्यांच्या सेवेत वाढ करावी, अशी मागणी होत होती. मात्र, ही बाब तातडीने शक्‍य नसल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने न्याहारी आणि निवास केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्यानुसार पहिल्या टप्प्यात पुणे विभागात हा प्रयोग प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आला. विशेष म्हणजे या केंद्रांना पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून पुणे विभागात सद्यस्थितीत अशा प्रकारची साडेचारशे केंद्रे आहेत. हा प्रतिसाद लक्षात घेऊन महामंडळाने कोकण विभागात 26 जानेवारीपासून गणपतीपुळे, दापोली, हरिहरेश्‍वर, तारकल्ली, संगमेश्‍वर, दिवे आगार, हर्णे, मुरुड, जंजीरा या पर्यटनाच्या ठिकाणी ही केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांमध्ये पर्यटकांना सवलतीच्या दरात राहाण्याची, जेवणाची आणि न्याहारीची व्यवस्था झाली आहे. या केंद्रांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन आगामी काळात अशा प्रकारची आणखी केंद्रे सुरू करण्याचा महामंडळाचा मानस आहे, अशी माहिती महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली.

स्थानिकांना रोजगार, पण दर्जाही तपासणार
महामंडळाने ही केंद्रे सुरू करताना आणि त्यांचे परवाने देताना कठोर अशी नियमावली तयार केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही खासगी निवासस्थाने भाड्याने देताना त्यांचे 24 तासांचे भाडे, त्यामध्ये पर्यटकांना मिळणाऱ्या सुविधा, जेवणाचा आणि न्याहारीचा दर्जा याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा इशाराच या केंद्र चालकांना दिला आहे. त्यासंदर्भात त्यांच्याशी लेखी करारही करण्यात आला आहे. या नियमावलींचे पालन न केल्यास परवाना रद्द करण्याचा इशाराही महामंडळाच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.