पीडीसी बॅंकेचे व्याजाचे 25 कोटींचे नुकसान

अजित पवार : नोटबंदी काळात बाद केलेल्या 22 कोटींच्या नोटा पडून

बुडीत समजण्याच्या नाबार्डच्या सूचना
बॅंकेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

पुणे – नोटबंदीच्या काळात बाद केलेल्या 22 कोटी 25 लाख रुपयांच्या नोटा अध्यापही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे पडून आहेत. त्या बुडीत समजण्यात याव्यात असे नाबार्डने बॅंकेस कळविले आहे. याविरोधात बॅंकेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या विलंबामुळे बॅंकेचे व्याजाचे सुमारे 25 कोटींचे नुकसान झाले असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची 101 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. यावेळी पवार यांनी ही माहिती दिली. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्षा अर्चना घारे आदींसह बॅंकेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले, केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोट बंदीचा निर्णय घेतला. बॅंकेकडे शेतकऱ्यांनी बाद झालेल्या 500 व 1000 रुपयांच्या नोटा जमा केल्या. बॅंकेकडे सुमारे 574 कोटींची रक्कम जमा झाली. ही रक्कम रिझर्व्ह बॅंकेने स्विकारण्यास विलंब केला. त्यामुळे बॅंकेने सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळवून 552 कोटींच्या नोटा रिझर्व्ह बॅंकेत जमा केल्या. त्याची रक्कम बॅंकेस मिळालेली आहे. या नोटांच्या संदर्भात सीबीआय, ईडी, नाबार्डने तपासणी केली असता त्यामध्ये कोणतीही अनियमितता नाही, असा अहवाल नाबार्डने दिला आहे. तरीही अजूनही 22 कोटी 25 लाख रुपयांच्या नोटा बॅंकेकडे अजूनही पडून आहेत. यामुळे बॅंकेचे व्याजाचे जवळपास 25 कोटींचे नुकसान झाले.

कर्जमाफीचा निर्णय झाला परंतु, पूर्ण कर्जमाफी झाली नाही. आजही बॅंक सक्षमपणे सर्वात पुढे आहे. शेतकरी बांधवांसाठी बॅंकेने व्याजाचा तोटा सहन केला व परतफेड अंतर्गत व्याज माफीचा निर्णय घेतला. बॅंकेने साखर कारखान्यांना 5.18 कोटी व्याज सवलत दिली असून शैक्षणिक कर्जाच्या मर्यादेमध्येही वाढ केली आहे. बॅंकेच्या ठेवी 10 हजार कोटींपर्यंत नेण्याचे आवाहनही पवार यांनी केले.

मार्च 2018 अखेर बॅंकेची एकूण उलाढाल 13 हजार 139 कोटींची असून भाग भांडवल 281 कोटी आहे. गंगाजळी व इतर निधी 1 हजार 36 कोटी आहे. बॅंकेच्या ठेवी 8 हजार 677 कोटी आहेत. तर, बॅंकेने 4 हजार 875 कोटींची कर्जे दिलेली आहेत. बॅंकेला 35 कोटींचा निव्वल नफा झालेला आहे. बॅंकेची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे बॅंकेचे अध्यक्ष थोरात यांनी सांगितले.

वेगवान बॅंकींग सुविधा देणे शक्‍य
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्व शाखा ऑनलाईन आहेत. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी कनेक्‍टिव्ही कमी आहे. त्याठिकाणी बीएसएनएलच्या माध्यमातून सॅटेलाईट कनेक्‍टिव्हीटी उपलब्ध करून दिली जात आहेत. यामुळे ग्राहकांना वेगवान बॅंकींग सुविधा देणे शक्‍य होणार आहे. अनुचित घटना घडू नयेत म्हणून संगणकीकृत यंत्रणा सक्षम करण्याचा निर्णय बॅंकेने घेतला आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)