पीएमपीचे बस थांबे गिळंकृत

विष्णू सानप

पिंपरी – “मेट्रो सिटी’कडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीएमएलच्या बस थांब्यांची दयनीय अवस्था झाली आहे. 80 टक्के बस थांब्यांसमोर खासगी वाहने, फेरीवाल्यांनी अतिक्रमणे केली आहेत. पीएमपीएमएल प्रशासनाबरोबरच पोलीस यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांची सुरक्षा धोक्‍यात आहे. फुकट्यांनी जाहिराती चिटकवून बस थांब्यांचे वेळापत्रक झाकले आहे. जवळपास 40 टक्के बस थांब्यांवर बस न थांबता मागे-पुढे थांबत असल्याने प्रवाशांना धावत-पळत बस पकडावी लागत आहे. वाहतूक व्यवस्थेबाबत पिंपरी-चिंचवडशी दुजाभाव करणाऱ्या पीएमपीएमएल प्रशासनाने बस थांब्यांच्या बाबतीतही सापत्निक वागणूक दिल्याचे दैनिक “प्रभात’ने केलेल्या पाहणीमध्ये पहायला मिळाले.

पिंपरी-चिंचवड ते पुणे दरम्यान असलेले सर्वांत मुख्य सार्वजनिक वाहतुकीचे साधन म्हणून पीएमपीकडे पाहिले जाते. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरी-व्यवसायानिमित्त अप-डाऊन करणारे व इतर कामानिमित्त नियमित पुण्यात जाणारे आणि येणाऱ्यांची दैनंदिन संख्या लाखोंमध्ये आहे. भल्या पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत निगडी ते दापोडी पर्यंतच्या पिंपरी-चिंचवड हद्दीतील रस्त्यावर पीएमपी धावत असते आणि प्रवासी बस स्थानक व थांब्यांवर बसची वाट पाहत असताना दिसून येतात. प्रवास सुरु करण्याचे स्थान असणारी बस स्थानके आणि थांबे मात्र अत्यंत बिकट अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरील बहुतेक थांब्यांवर प्रवाशांनी बसण्यासाठी देखील जागा नाही.

सात मुख्य, वीस विनंती थांबे
पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी ते दापोडी या महामार्गावर सात प्रमुख बस थांबे आहेत. दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, इंडियन कार्ट, मोरवाडी, रॅस्टन कंपनी, निगडी, भक्ती-शक्ती हे मुख्य बस थांबे आहेत तर याच मार्गावर वीस विनंती बस थांबे आहेत. यापैकी बहुतांश बस थांब्यांची अवस्था वाईट असल्याचे दैनिक “प्रभात’च्या पाहणीत दिसून आले. बहुतेक बस थांब्यांवर बसचे वेळापत्रक नसल्याने प्रवाशांना बस किती वाजता येणार आणि आपण वेळेवर पोहचणार का याचा अंदाज येत नाही.

बस थांब्याची परिस्थिती
पिंपरी चौकातील बस स्थानकावर प्रवाशांना बसण्याकरता पुरेशी जागा नसून फुकटच्या जाहिरातीच्या पत्रकाने वेळापत्रक झाकले आहे. त्यामुळे प्रवाशांना बसच्या वेळापत्रकाबद्दल माहिती मिळत नसून तास-न-तास प्रवाशांना उन्हात उभे रहावे लागत आहे. चिंचवडमधील प्रवाशांसाठी झाडच बस थांबा झाले आहे. प्रवाशांना बसची वाट पाहत झाडाखाली उभे राहावे लागत आहे. जो बसथांबा आहे, त्याचा ताबा सध्या लिंबू सरबत आणि भेळच्या गाडीने घेतला आहे. पीएमपी प्रशासनाचे याकडे जराही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. मोरवाडीतील बस थांबा नावापुरता आहे, कारण येथे देखील प्रवाशांना रस्त्यावर उभे राहवे लागते. या ठिकाणी देखील वेळापत्रकाच्या बोर्डवर जाहिरातींच्या पत्रकांचे थरावर थर चिकटले आहेत. बस थांब्यावर पीएमपीपेक्षा अधिक अधिकार ऑटो रिक्षावाल्यांचा असल्याचे भासते.

बरोबर समोर ऑटो-रिक्षा उभे राहत असल्याने प्रवाशांना थांब्याच्या आधी किंवा नंतर पळत जाऊन बस पकडावी लागत आहे. याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरीक व लहान मुलांना होतो. या धावपळीत दुर्घटना होण्याचीही शक्‍यता आहे. तसेच निगडीतील बस स्थानकांवर तर रिक्षावाल्यांचा एकाधिकार आहे. रिक्षावाल्यांमुळे अर्धा रस्ता व्यापला जातो आणि प्रवाशांना रस्त्याच्या मधोमध थांबावे लागते. येथे पीएमपीच्या प्रवाशांना रिक्षाचालकांचा त्रासही सहन करावा लागतो. एका प्रवाशाला किमान दहा रिक्षावाले कुठे जायचे विचारतात? बऱ्याचदा रिक्षा प्रवाशांना चिटकून उभी करतात. वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून येथे गोल-गोल फिरत राहतात. कासारवाडी, दापोडी, रॅस्टन कपंनी, फुगेवाडी या ठिकाणी सुद्धा सारखीच परिस्थिती बघायला मिळाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)