पीएमआरडीएच्या घरांचा भोर पॅटर्न तयार करा

आमदार थोपटे : भोर तालुक्‍याती विविध गावांतील 2300 लोकांना पहिल्या टप्यात

भोर- केंद्र शासनाच्या पीएमआरडीए योजनेत 2 लाख 50 हजार रुपयांची अनुदानीत नवीन घरे शासन बांधून देणार आहे. या सर्व घरांना एकसारखा रंग देवून राज्यात भोर पॅटर्न पोहोचवावा, असे आवाहन आमदार संग्राम थोपटे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना केले.

पूर्व भागातील भोंगवली गणातील 1609 लाभार्थ्यांना पांडे येथील मंगल कार्यालयाच्या सभागृहात घर मंजुरीची प्रमाणपत्र आमदार संग्राम थोपटे यांचे हस्ते वाटप करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात भोर तालुका पंचायत समितीच्या सभापती मंगल बोडके, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, भोर तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल तनपुरे, पीएमडीआरएचे मुख्य समन्वयक नितीन सावंत, समर्थ गंगवाला, राजगडचे संचालक के. डी. सोनवणे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, नाना सुके, दिलीप बाठे, युवक कॉंग्रेस अध्यक्ष नितीन दामगुडे, महेश टापरे, सीमा सोनवणे, सुरेखा निगडे, शंकर धाडवे पाटील, दत्तात्रय भिलारे, जिल्हा परिषदेच्या सदस्या शलाका कोंडे, पंचायत समितीच्यासदस्या पुनम पांगारे उपस्थित होते.

आमदार थोपटे म्हणाले की, शासनाच्या घरकुल योजनेत दारिद्रय रेषेखालील लोकांना अवघे 1 लाख 30 हजार रुपयांचे अनुदान मिळत होते. ते केंद्र शासनाच्या या योजनेत 2 लाख 50 हजार मिळणार आहे. नजीकच्या काळात ज्यांना घर बांधणीसाठी जागा नाही त्यांना गावातील गायरानच्या जमिनी अधिग्रहित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक घेणार असून हा प्रश्न मार्गी लावला जाईल.

वागजवाडी येथे ट्रामा सेंटर सुरू केले जाणार असून केंद्र शासनाची ही योजना लाभार्थ्यांसाठी वरदान ठरणार आहे. पीएमडीआरडीए योजनेची निर्मिती सन 1999 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी केली असली तरी त्यावेळी गती मिळाली नव्हती. आज गती आली असून यासाठी तब्बल 1 वर्ष पाठपुरावा केला असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक विठ्ठल पवार यांनी केले तर सरपंच भानुदास साळुंके यांनी आभार मानले.

  • जिल्ह्यात भोर अव्वल
    जिल्ह्यातील 9 तालुक्‍यांत भोर अव्वल असून 6 हजार ऑनलाईन अर्ज नोंदवले गेले आहेत. या सर्वांना घरे मिळणार असून तालुक्‍यात 150 कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. यातुन तालुक्‍यातील लोकांना रोजगार मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.