पुणे-नाशिक महामार्ग ते महाळुंगे रस्त्याच्या नुतनीकरणास प्रारंभ
आंबेठाण- चाकण शहराची वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पुणे-नाशिक रास्ता ते महाळुंगे या रस्त्याच्या नुतनीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पीएमआरडीएच्या माध्यमातून या रस्त्यासाठी साडेबारा कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून पीएमआरडीएकडून होणारा हा खेड तालुक्यातील पहिलाच रस्ता आहे.
पुणे-नाशिक रस्ता ते बिरदवडी मार्गे महाळुंगे (इंगळे) हा जवळपास सात किलोमीटर अंतराचा रस्ता आहे. चाकण शहराची वाहतूककोंडी टाळण्यासाठी हा महत्त्वाचा पर्यायी रस्ता आहे. मुंबई, तळेगाव दाभाडे मार्गे येऊन नाशिककडे जाण्यासाठी आणि पुन्हा याच मार्गे परत जाणाऱ्या वाहनचालकांना हा कमी अंतराचा, वेळ आणि इंधन वाचविणारा रस्ता आहे. याशिवाय महाळुंगे एमआयडीसी आणि आंबेठाण परिसरातील कारखाने तसेच चाकण जवळील पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळामधील कंपन्या यांना जोडण्यासाठी देखील हा महत्त्वाचा पर्यायी रस्ता आहे; परंतु केवळ दुरुस्ती अभावी प्रवाशांना या मार्गाचा वापर करता येत नव्हता. त्यामुळे प्रवाशांना चाकणमार्गे राजगुरूनगर आणि नाशिककडे जावे लागत आहे. परंतु आता होणारा रस्ता फायदेशीर ठरणारा आहे.
- सध्या या रस्त्याची रुंदी तीन मीटर असून नुतनीकरणात ती सात मीटर डांबरीकरण केली जाणार आहे. तसेच दुतर्फा दीड-दीड मीटरच्या साईड पट्ट्या केल्या जाणार आहेत. आवश्यक ठिकाणी मोऱ्या टाकल्या जाणार असून गरजेच्या ठिकाणी रस्ता सिमेंट कॉंक्रीटीकरण केला जाणार आहे. महाळुंगे गावाच्या बाजूने जवळपास 800 मीटर सिमेंट कॉंक्रीटीकरण केले असून उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे.पावसाळ्यापूर्वी हे काम व्हावे अशी मागणी प्रवाशी आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे.