पिस्तुलाचा धाक दाखवून लुटमार

दोन सराईतांना अटक : रसे येथील हॉटेलमधील घटना

चाकण – हॉटेलमध्ये रात्रीच्या वेळेस येऊन आम्हाला जेवायला दे असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करीत हॉटेल मधील टीव्ही, फ्रिज व टेबल खुर्च्यांची मोडतोड करून गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून हॉटेलच्या गल्ल्यातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रकार सोमवारी (दि. 25) रात्री रासे येथे घडला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी पाठलाग करीत दोन तरुणांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, गावठी पिस्तूल व दोन जीवंत काडतुसे, रोख रक्कम असा एकूण 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे (वय 27) व सुनील अशोक मुंगसे (वय 34, दोघेही रा. रासे) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. तर सौरभ गोरक्षनाथ शिंदे (वय 21, रा. रासे) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील रासे गावच्या हद्दीत गावरान या नावाचे हॉटेल आहे. सोमवारी (दि. 25) रात्री अकराया दरम्यान स्वप्नील शिंदे व सुनील मुंगसे हे दोघे हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले होते. आम्हांला बटर चिकन मसाला, बिर्याणी व रोटी भाकर खायला द्या, असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली.

हॉटेल मधील एलसीडी, फ्रीज, व टेबल खुर्च्यांची तोडफोड केली. तर स्वप्नील शिंदेने त्याच्या कमरेचे गावठी पिस्तूल काढून मारण्याची भीती दाखवत गल्ल्यातील रोख 4 हजार 600 रुपये काढून घेतले. तर सुनील मुंगसेने हॉटेलातील कामगारांना शिवीगाळ, दमदाटी व बेदम मारहाण केली. त्यानंतर हे दोघे दुचाकी (एमएच 14 एफझेड 8595) ने शिक्रापूरच्या दिशेने पोबारा केला. याबाबत हॉटेल मालक सौरभ शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड नियंत्रण कक्षाला माहिती दिली व नियंत्रण कक्षाकडून चाकण पोलीस पोलीस स्टेशनला वायरलेसद्वारे माहिती दिल्यानंतर अवघ्या पाच ते दहा मिनिटांत चाकण पोलिसांनी या दोन्ही आरोपींना पाठलाग करून पकडले तसेच त्यांच्याकडे मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या कारवाईमध्ये चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुनील दहिफळे, उपनिरीक्षक विक्रम पासलकर, उपनिरीक्षक विजय जगदाळे, पोलीस नाईक अनिल गोरड सावंत, कुडके, होले यांनी सहभाग घेतला. पुढील तपास उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार हे करीत आहे.

  • स्वप्निलवर यापूर्वी अनेक गुन्हे
    आरोपी स्वप्निल उर्फ सोप्या संजय शिंदेवर चाकण पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर खून ,खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)