पित्तशामक धने – ३

निद्रानाशावरती धन्याचा उपाय : जर झोप येत नसेल तर कोथिंबिरीचा रस काढून त्यात साखर घालावी आणि त्याचा पाक करावा. मग या पाकाचे सरबत करावे आणि रोज घ्यावे म्हणजे चांगली झोप लागते.

चक्‍कर येत असल्यास धन्याचा उपयोग : काही वेळा अशक्तपणामुळे अथवा कमी रक्तदाबामुळे सारखी चक्‍कर येते अशावेळी धने आणि साखर सारख्या प्रमाणात घेऊन त्यात गुलाब पाणी मिसळावे. आणि ते पाण्यात मिसळून प्यावे. म्हणजे चक्‍कर थांबते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मलेरिया, विषमज्वरात धन्याचा उपयोग
जर रोग्याला मलेरिया अथवा विषमज्वराचा ताप आला असेल आणि वारंवार उलट्या होत असतील तर अर्धवट कुटलेले धने आणि बेदाणे समप्रमाण घेऊन ते पाण्यात भिजवावे मग चांगले कुस्करून स्वच्छ पातळसर कापडातून गाळुन घ्यावे. हे पाणी थोडे थोडे चमचा-चमचा रोग्याला प्यायला द्यावे.
त्यामुळे विषमज्वर आणि मलेरियाचा ताप बरा होण्यास व उलट्या थांबण्यास मदत होते.

प्रमेह विकारावर धन्याचा उपाय
प्रमेह विकारामुळे त्रस्त झालेल्यांनी धन्याचा उपयोग करावा. हिरव्या कोथिंबिरीचा रस 100 ग्रॅम, कोथिंबीर न मिळाल्यास 50 ग्रॅम धने, रात्री 300 मि.ली ग्रॅम पाण्यामध्ये भिजत घालावेत व सकाळी उकळवावे. त्यात ब्रॅंडी किंवा शुद्ध मध 20 ग्रॅम, चंदनतेल पाच ग्रॅम या तिन्ही वस्तू एकत्र करून बाटलीमध्ये भरून ठेवाव्यात. सात दिवसानंतर ते गाळून घ्यावे. पाच ग्रॅम सकाळ, संध्याकाळ रोज घ्यावे. यामुळे लघवीची जळजळ, जखमेतून पू निघणे, रक्त निघणे बंद होऊन प्रमेहविकार बरा होतो. म्हणूनच प्रमेह विकारावर धने हे अतिशय गुणकारी आहे.

लघवीच्या विकारावर धन्याचा इलाज
जर लघवी करताना जळजळ होणे, थोडी थोडी होणे, लघवीच्या जागी दुखणे, उन्हाळी लागणे असे विविध लघवीचे विकार म्हणजेच युरिन इन्फेक्‍शन झाले असेल तर अशावेळी एक नवीन मडके घ्यावे. ते दोन-तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्यावे. त्यामध्ये 25 ग्रॅम धन्याची पूड टाकावी व वरून उकळलेले पाणी अर्धा लिटर टाकावे. ते रात्रभर ठेवून सकाळी गाळून घ्यावे. पंचवीस ग्रॅम बत्तासे घेऊन त्याचे दोन भाग करावे.

दिवसातून तीन ते चार वेळा द्यावे. यामुळे लघवीतून रक्त जाणे, लघवी अडत असल्यास, आग होत असल्यास वरील औषध घेतल्याने बरे होतात. लघवीला आग होत असल्यास साजूक तूप आणि कापूर एकत्र करून त्याचा लेप लावावा. किंवा कडुनिंबाची पाने पाण्यात उकळून थंड करून तो भाग वरील पाण्याने धुवावा. नंतर त्यावर थंड पाण्याची धार सोडावी याने लघवीचे विकार बरे होतात. थोडक्‍यात लघवीच्या विकारांवर धने हे अतिशय उपयुक्त आहेत.

उन्हामुळे उलट्या होत असतील तर…
काही वेळा अति उष्णतेमुळे उलट्याचा त्रास होतो पण धने हे ज्वरनाशक, दीपक, दाहशामक, अरूचीनाशक, आणि तृषाशामक असल्याने उलटीवर गुणकारी आहे. अशावेळी उपाय करताना एक मातीचे स्वच्छ भांडे घ्यावे किंवा स्टीलचे भांडे घेतले तरी चालेल. त्यामध्ये ऐंशी ग्रॅम धन्याची पावडर टाकून त्यात अर्धा लिटर पाणी घालावे. ते दोन ते तीन तास मुरू द्यावे. नंतर त्यातून शंभर ग्रॅम पाणी गाळून घ्यावे. त्यात दहा ते वीस ग्रॅम बत्ताशे टाकून ते पाणी रोग्यास पिण्यास द्यावे.

असे दिवसातून चार वेळा चार-चार तासाच्या अंतराने द्यावे. यामुळे चक्‍कर येणे, उलट्या होणे, छातीत धडधडणे हे विकार बरे होतात. चक्‍कर येत असल्यास धन्याचे सरबत घ्यावे हे मागे सांगितले आहेच. तेव्हा उष्णतेच्या विकारावर धने अतिशय गुणकारी आहेत.

घशाच्या रोगांवर धन्याचा इलाज
काही वेळा खूप घसा दुखतो तर कधी मसालेदार आणि तेलकट खाण्यामुळे घसा बसतो. अशावेळी धने बहुगुणी आहेत. त्यांचा उपयोग औषधात करावा म्हणजे घशाचे विकार बरे होतील. यासाठी खालीलप्रमाणे औषध घ्यावे. एक-दोन ग्रॅम धन्याची पावडर किंवा आख्खे धने तोंडात टाकून त्याचा रस हळूळू प्यावा. पूर्ण धने खाल्यास चावून चावून दाताने खावे. याने घसा बसणे, घसा दुखणे इत्यादी विकार बरे होतात. घशाच्या विकारावर दुसरा इलाज असा
मीठ घालून कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात. गळ्याला वुलनचे कापड गुंडाळावे. धन्याचे सरबत प्यावे. घसा गरम पाण्याच्या पिशवीने शेकावा. आहार हलका घ्यावा. शक्‍यतो कोमटपाणीच वापरावे. गरम दूध, गरम पाणी, गव्हाची खीर, व साजूक तुपामध्ये धने-ओवा टाकून गरम करून घ्यावे. वरील औषध घेतल्याने आवाज बसलेला सुटतो. व घसा दुखायचा थांबतो.

तोंडाला चव नसल्यास धन्याचा उपाय
धने, वेलदोडा, व मिरे कुटून त्यात खडीसाखर व तूप घालून त्याचे चाटण चाटल्याने तोंडाला चव येते.
धने, जिरे, मिरे, पुदिना, सैंधव आणि बेदाणे लिंबाच्या रसात वाटून बनविलेल्या चटणीचा उपयोग भोजनात करावा म्हणजे तोंडाला चव येते.

सतत तहान लागत असल्यास धन्याचा उपाय : धने पाण्यात भिजत ठेवून त्यात ते चांगले कुस्करावेत. नंतर ते पाणी गाळून घेऊन त्याला मध व साखर घालून वरचेवर ते पाणी प्यायल्याने तहाने शांत होते. तापात वरचेवर तहान लागते. अशा वेळी धने, खडीसाखर व बेदाणे पाण्यात भिजत घालावेत. नंतर ते चांगले कुस्करून ते पाणी गाळून घेऊन हे पाणी रोग्याला दिले असता वरचेवर तहान लागणे कमी होते.

मूळव्याधीवर धन्याचा उपयोग : धने रात्री भिजत घालावे. सकाळी ते पाणी गाळून प्यायल्याने अथवा कोथिंबीरीचा रस प्यायल्याने स्त्रवणाऱ्या मूळव्याधीत शौचावाटे पडणारे रक्त बंद होते. हिरवे धने वाटून ते गरम करून त्याची पुरचुंडी करून मूळव्याधीची जागा शेकल्याने मुळव्याधीचा मोड मऊ पडतो व मोड दुखण्याचे थांबते. तसेच धने आणि खडीसाखरेचे पाणी उकळून काढा करावा. हा काढा नियमित प्यायल्यामूळे मूळव्याधीवाटे पडणारे रक्त बंद होते.

सुजाता गानू 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)