पिंपळे खालसाचा नचिकेत शेळके आयपीएस अधिकारी

यूपीएससी परीक्षेत केंद्रात 167वा ः राज्यातून एकटाच नियुक्त

शिक्रापूर-पिंपळे खालसा (ता. शिरूर) हे गाव एक अधिकारी वर्गाचे गाव म्हणून ओळखले जात असताना आता याच गावातील शेतकरी कुटुंबातील नचिकेत शेळके हा आयपीएस अधिकारी झाला असून त्यामुळे गावातील वैभवात अजून भर पडली आहे.

पिंपळे खालसा येथील शेतकरी कुटुंबातील नचिकेत शेळके हा सुरुवातीपासून एक अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहत होता. नचिकेतचे आई-वडील चंद्रसेना व विश्वनाथ शेळके हे दोघे प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक असल्यामुळे त्याला सुरवातीपासूनच शालेय धडे मिळाले. पिंपळे खालसा येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण पुणे येथे पूर्ण करत नुकतेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या 2018 परीक्षेत त्याने केंद्रात 167 वा क्रमांक मिळविला. 2018च्या परीक्षेतून महाराष्ट्रातून एकमेव आयपीएस अधिकारी बनण्याचा मान मिळविला आहे. नचिकेतच्या यशाबद्दल त्याचे शिरूर तालुक्‍यासह पुणे जिल्ह्यातून कौतुक होत आहे. नुकताच पिंपळे खालसा ग्रामस्थांच्या वतीने नचिकेतचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कर आयुक्त विलास इंदलकर, राज्य कर अधिकारी पुणे दत्तात्रय गावडे, आयआरएस अधिकारी डॉ. श्रीधर धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश धुमाळ, माजी आमदार काकासाहेब पलांडे, सर्व ग्रामस्थ तसेच सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांसह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सत्काराला उत्तर देताना नचिकेत शेळके म्हणाला, मला अधिकारी व्हायचे होते म्हणून मी त्या दृष्टीने प्रयत्न करत होतो. त्यामध्ये मला माझे आई-वडील व शिक्षकांचे मोठे मार्गदर्शन लाभले. नंदकुमार पलांडे यांनी मला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले त्यामुळे मी आज आई-वडिलांसह स्वतःचे स्वप्न पूर्ण करू शकलो. मुलांना ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यामध्ये त्याला मदत करावी तसेच पालकांनी मुलांवर कोणत्याही क्षेत्रासाठी दबाव टाकू नये, असे आवाहन नचिकेतने केले. पुढील काळामध्ये गावातून अजूनही अधिकारी होण्यासाठी शालेय मुलांना योग्य मार्गदर्शन तसेच मदत करणार असल्याची ग्वाही दिली.

  • पिंपळे खालसा गावातून यापूर्वी अनेक विद्यार्थी अधिकारी झालेत. प्रत्येक वर्षी अनेक मुले शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवत आहेत. त्यामुळे पिंपळे खालसा गावाचे नाव महाराष्ट्रात गाजत आहे. आता नचिकेत शेळके याने आयपीएस अधिकारी होऊन पिंपळे खालसाचे नाव राज्यासह देशात झळकाविले असल्यामुळे आम्हाला नचिकेतचा अभिमान आहे.
    -राजाराम धुमाळ, माजी सरपंच
    -प्रवीण शिवरकर, उद्योजक

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.