पिंपरी सांडसच्या जागेचा निर्णय कधी?

प्रस्ताव लालफितीत


कचरा प्रकल्पासाठी वनखात्याची दिरंगाई

पुणे- शहरात वारंवार रण माजवणाऱ्या कचरा प्रश्‍नाची साडेसाती संपता संपेना अशी स्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेने जे काम हाती घेतले त्याला “खो’ बसत आहे. पिंपरी सांडस येथील नियोजित कचरा प्रक्रिया प्रकल्पाचेही असेच झाले असून, ही जागा वनखात्याकडून महापालिकेला हस्तांतरित करण्याला अधिकच दिरंगाई होत आहे.

पिंपरी सांडस येथील जागा ताब्यात येणार असल्याने महापालिकेने कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत. तुळापूरमधील महापालिकेची जागा वन खात्याला दिली आहे; परंतु महापालिकेला जागा मिळालेली नाही. वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत याबाबत चर्चा सुरू आहे.
– सुरेश जगताप, उपायुक्त तथा विभाग प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन

शहरातील कचऱ्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्याच्या उद्देशाने पिंपरी सांडस येथील 19.9 हेक्‍टर जागा महापालिकेला देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर महापालिकेने वेगाने हालचाली केल्या. वनखात्याची जागा मिळाल्यानंतर त्यांना कोणती जागा द्यायची याचीही निश्‍चिती झाली; परंतु वन खात्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने जागेचा प्रस्ताव पुन्हा धूळ खात पडला आहे. त्यातून महापालिकाही फारसा पाठपुरावा करत नसल्याचे दिसून येत आहे.

वन खात्याशी चर्चा सुरू असून, कायदेशीर बाबींची पूर्तता करीत आहोत. त्यानंतर जागा ताब्यात येईल, असे तेच ते उत्तर महापालिका प्रशासनाकडून आजपर्यंत देण्यात येत आहे.
शहरात रोज जमा होणारा कचरा आणि त्यावर प्रक्रिया करणारी पूर्णत: अपयशी झालेली यंत्रणा यामुळे दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या भीषण होत चालली आहे. त्यातच, उरुळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांनी कचरा डेपो हलविण्याची मागणी लावून धरली आहे.

ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी लक्ष घालण्याचे आश्‍वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले होते.

जागा महापालिकेला मिळणार का?
महापालिकेच्या मागणीनुसार, कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी पिंपरी सांडस येथील 19.9 हेक्‍टर जागा देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी निर्णय 4 मे 2017 रोजी घेतला. त्याला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे तुळापूर येथील महापालिकेच्या ताब्यातील 19.9 हेक्‍टर इतकी जागा वन खात्याला देण्यात आली आहे. शिवाय, जागा ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेचे शुल्कही महापालिकेने भरले आहे; असे असताना पिंपरी-सांडसमधील जागा महापालिकेला देण्याच्या हालचाली वन खाते करतच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही जागा महापालिकेला मिळणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)