पिंपरी – सुमारे वर्षभराचा कालावधी शिल्लक असताना पिंपरी विधानसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्याने कमालीची चुरस निर्माण होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यातल्या त्यात या जागेवर दावा करणाऱ्या आरपीआयच्या आठवले गटात इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भाजपही आता या जागेवर दावा करण्याच्या तयारीत आहे.
शहरातील पिंपरी, भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघांपैकी भोसरी व चिंचवडची राजकीय समीकरणे बऱ्यापैकी ठरलेली आहेत. मात्र, अनुसुचित जातीकरिता राखीव असलेल्या पिंपरी विधानसभेकरिता आरपीआयबरोबरच भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या वाढत आहे. गेली विधानसभा निवडणूक अगदी थोड्या मतांच्या फरकाने गमावलेल्या माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे या उमेदवारीकरिता प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. मात्र, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेले आरपीआय उद्योग सेलचे प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम हे देखील उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. आठवले यांच्या पुणे व पिंपरी-चिंचवड दौऱ्यात आठवले यांच्याशी त्यांचे असलेले घनिष्ठ संबंध दिसून आले आहेत. विद्यमान नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांचे देखील नाव इच्छुकांच्या यादीत आहे.
शिवसेनेचे विद्यमान आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांची अभ्यासू आमदार अशी ओळख आहे. मात्र, शिवसेनेच्या संघटनात्मक प्रक्रियेत त्यांचे म्हणावे तसे योगदान नसल्याची शिवसैनिकांची तक्रार आहे. त्यांना सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेची “ऑफर’ असल्याचा अंदाज आहे. मात्र, खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून, विधान सभेकरिता शिवसेनेत आणखी एक दावेदार निर्माण केला आहे. ननावरे देखील आता प्रसिद्धी झोतात राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
राष्ट्रवादीकडून माजी आमदार अण्णा बनसोडे इच्छुक आहेत. आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत, त्यांनी पिंपरी मतदार संघात ठिकठिकाणी फ्लेक्स लावून, चर्चेत राहण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. याशिवाय मतदार संघात “आंदण’ सारखा सामाजिक उपक्रम सुरु ठेवत, सतत नागरिकांच्या संपर्कात राहण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आझम पानसरे यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेले किवळे येथील उद्योजक आणि सुर्योदय प्रतिष्ठानचे बाळासाहेब गायकवाड हे देखील निवडणुकीकरिता प्रबळ इच्छुक आहेत. याशिवाय भाजप नगरसेविका सीमा सावळे, खासदार अमर साबळे यांच्या कन्या वेणू साबळे तसेच नॉव्हेल इन्स्टिट्यूटचे अमित गोरखे हे देखील इच्छुक आहेत. पिंपरी विधानसभा मतदार संघातील हलचाली पाहता. या यादीत आणखी इच्छुकांची भर पडण्याची शक्यता आहे.
भाजपला फुटीचा धोका?
मोदी लाट याही वेळी तारणार, असा विश्वास भाजपमधील इच्छूकांना आहे. तर विधानसभा मतदार संघातील सामाजिक स्थिती आणि भाजपचा मित्र पक्ष म्हणून आपलेच पारडे जड राहील, अशी अपेक्षा रिपाइंला (आठवले गट) आहे. महापालिका ताब्यातून गेलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी हा मतदार संघ प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. भाजप विरोधातील नाराजीचा फायदा, युतीतील दुफळी आणि कॉंग्रेसची मिळणारी साथ याचा लाभ होण्याचे समीकरण राष्ट्रवादीकडून आखले जात आहे. तर शिवसेनेला आपला बालेकिल्ला टिकवून ठेवायचा आहे. सद्यस्थितीमध्ये या चारही प्रमुख पक्षांना पिंपरी विधानसभा मतदार संघ सोईचा वाटत आहे. भाजपमध्ये इच्छुकांची सर्वाधिक संख्या असताना रिपाइंला ही जागा गेल्यास भाजपमध्ये उभी फूट पडण्याची भिती व्यक्त होत आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा