पिंपरी – येत्या 1 जुलैपासून महापालिकेच्या हद्दीतील कचरा उचलण्याने काम दोन ठेकेदारी संस्थांच्या वतीने सुरु केले जाणार आहे. मात्र, हे काम सुरु होत असतानाच नव्याने अतिरिक्त ठरणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना याच कामात सामावून घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्तांकडे केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा संकलन व मोशी डेपोपर्यंत वाहून नेण्याचे काम बी. व्ही. जी. आणि ए. जी. एन्व्हायरो या दोन ठेकेदारांना देण्यात आले आहे. मात्र, हे काम सुरु करण्यापूर्वी जुन्या ठेकेदाराकडे आठ ते दहा वर्षे काम करणारे अनेक सफाई कर्मचारी आहेत. या या ठेक्यामुळे अनेक कर्मचारी अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्यास, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. हा या कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे या दोन्ही ठेकेदार संस्थांचे काम सुरु होण्यापूर्वीच या सर्व कर्मचाऱ्यांच्या हाताला काम मिळेल, याची खबरदारी प्रशासनाने घेण्याची मागणी केली आहे.