पिंपरी-चिंचवड शिवसेनेत कलहाची नांदी

– शहर सुधारणा समितीच्या नवनियुक्त सदस्याचा महासभेतच राजीनामा

पिंपरी – लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती येत नाही तोच पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेत कलहाची नांदी सुरू झाली आहे. शिवसेनेच्या रेखा दर्शिले यांची महासभेत शहर सुधारणा समितीच्या सदस्यपदी निवड जाहीर करण्यात आली. परंतु, त्यांनी तत्काळ महासभेत राजीनामा दिला. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांच्यातील अंतर्गत वादातून राजीनामानाट्य रंगल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

खासदार बारणे दुसऱ्यांदा मावळ लोकसभा मतदार संघातून आपले नशिब आजमावत आहेत. बारणे व शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांच्यातील गटबाजी मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकाच्या फ्लेक्सवर झळकत राहुल कलाटे यांनी बंडाचे निशान फडकावले होते. परंतु, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर लोकसभा निवडणुकीत त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. शिवसेनेचे इतर पदाधिकारी खासदार बारणे यांच्या प्रचारात सक्रीय असताना राहुल कलाटे त्यापासून चार हात लांब असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे दोघांमधील दरी रुंदावल्याचे पहायला मिळत आहे. शहर सुधारणा समितीच्या सदस्य राजीनामानाट्यातून पक्षांतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.