पिंपरीत उभारणार 110 सदनिका

पिंपरी – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरीतील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 110 सदनिका बांधल्या जाणार आहेत. त्याकरिता पिंपरीतील 226 पै/3, 227 पै सर्व्हे नंबरमधील 1500 चौ. मीटर जागा महापालिकेच्या ताब्यात असून, त्याकरिता येणाऱ्या 13 कोटी 91 लाख रुपये खर्चाला मान्यतेचा प्रस्ताव महासभेसमोर ठेवण्यात आला आहे.

केंद्र सरकारने नागरी भागासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविली जाते. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत सर्वांकरिता घरे-2022 ही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने म्हाडाची राज्यस्तरीय सुकाणू अभिकरण समिती म्हणून नेमणूक केली आहे. या योजनेचा आराखडा तयार करून मागणी सर्वेक्षण बाबतचा अहवाल देण्याचे महापालिका प्रशासनाला कळविले आहे. त्यानुसार सर्व सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आर्थिक मागास घटकांसाठी 110 सदानिका बांधण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. याकरिता महापालिका नि:शुल्क जागा उपलब्ध करुन देणार आहे.

या योजनेअंतर्गत उभारल्या जाणाऱ्या सदनिकांसाठी 12 कोटी 10 लाख खर्च होणार आहे. मात्र. सीमाभींत दुरुस्ती, रस्ते, पावसाठी गटर, पाणीपुरवठा, ड्रेनेज, घनकचरा व्यवस्थापन आणि दिवाबत्ती ट्रान्सफॉर्मर या सुविधांकरिता 27 लाख रुपये खर्च येणार आहे. तसेच पाच टक्के भाववाढ अन्य कामांच्या सात टक्के खर्चासह एकूण 13 कोटी 91 लाख रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या सध्याच्या रेडी रेकनरनुसार जागेची किंमत, बांधकाम परवानगीचे विकास शुल्क, प्रिमिअम शुल्क आदी खर्च लाभार्थ्यांकडून घेतला जाणार नाही.

लाभार्थीचा साडे आठ लाखांचा हिस्सा
या योजनेअंतर्गत बांधल्या जाणाऱ्या प्रत्येक सदनिकेला 11 लाख रुपये खर्च येणार आहे. तर प्रत्येक लाभार्थ्याला 545 चौ. फुटांची सदनिका उपलब्ध होणार आहे. बांधकामाचा खर्च प्रति चौरस फुट 2018 रुपये एवढा येणार आहे. तसेच प्रत्येक लाभार्थ्याला केंद्र सरकारकडून दीड लाख तर राज्य सरकारकडून एक लाख रुपये आर्थिक अनुदान मिळणार आहे. तर उर्वरित साडे आठ लाख रुपये लाभार्थ्याने भरायचे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.