पिंगोरीतील विकासकामांची रोटरीच्या विदेशी सदस्यांकडून पाहणी

पाणलोट विकास व सेंद्रिय शेती पाहून सदस्य झाले चकित

नीरा- पुरंदर तालुक्‍यातील पिंगोरी गावातील नागरिकांनी केलेल्या पाणलोट क्षेत्रातील विविध विकासकामांची पाहणी रोटरी क्‍लबच्या विविध देशातील सदस्यांनी केली. त्याच बरोबर पुढील विकासकामांना आणखी मदत देण्याचे जाहीर केले आहे.
पुरंदर तालुक्‍यातील पिंगोरी येथे शासकीय, खाजगी, लोकसहभागातून पाणलोट क्षेत्रातील अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. सिमेंट नाले, सीसीटी, मातीचे बंधारे, शेततळे आदी पाणलोट विकासाच्या कामांबरोबरच शेतीच्या सिंचनासाठी ठिबक सिंचन योजना राबवण्यात आली आहे. त्याचबरोबर 50 एकर क्षेत्रात सेंद्रिय शेती करण्यात येत आहे. यासाठी विविध भागातील रोटरी क्‍लबच्या माध्यमातून अर्थसाह्य करण्यात आले होते. हे करण्यात आलेले अर्थसाह्य योग्य दिशेने उपयोगात आणले गेले आहे का? व यापुढे आणखी कोणते अर्थसाह्य करता येईल याबाबत पाहणी करण्यासाठी हे विदेशी पाहुणे आले होते.
सकाळी दहा वाजता या विदेशी व स्वदेशी पाहुण्यांचे पिंगोरी ग्रामस्थांनी स्वागत केले. यामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड या भागातून आलेले रोटरीचे सदस्य त्याचबरोबर अमेरिका फिनलॅंड आणि कॅनडा या देशातील रोटरीचे सदस्य उपस्थित होते. यानंतर पिंगोरी येथील वाघेश्वरी मंदिरात छोटी सभा होऊन पाहुण्यांचा आदर सत्कार करण्यात आला व त्यांना आजपर्यंत त्यांनी दिलेल्या अर्थसाह्यातून करण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती देण्यात आली.
यानंतर या विदेशी पाहुण्याला वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या विकासकामांची माहिती देऊन प्रत्यक्ष भेट देण्यात आली. हिंगोलीतील पाझर तलाव, शेततळे, नाला बिल्डिंग आदी ठिकाणी पाहुण्यांनी भेट दिली. माहिती घेतली व ग्रामस्थांनी केलेल्या कामांचे कौतुक केले. या विकास कार्यक्रमाचे समन्वयक बाबा शिंदे यांनी या रोटरीच्या सदस्यांना केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. यावेळी उपसरपंच वसंत शिंदे, माजी सरपंच पल्लवी भोसले, माजी सैनिक कॅप्टन शाम शिंदे, पोलीस पाटील राहुल शिंदे, महादेव शिंदे, लक्ष्मण शिंदे, कल्याण धुमाळ, निनाद शिंदे, जीवन शिंदे, जनार्दन चौधरी समवेत मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.