पिंगळा महाद्वारीं, बोली बोलतो देखा…

सुनिल बटवाल
चिंबळी-
पिंगळा महाद्वारीं । बोली बोलतो देखा ।
शकुन सांगतों तुम्हां हा एक ऐका ।।
डुग डुग ऐका डुग डुग ऐका ।।
भविष्यात डोकावण्याचे वेगवेगळे मार्ग, पद्धती या माणसाच्या भौतिक विकासाबरोबर बदलत गेल्या. इंटरनेटवर ज्योतिषाचे दुकान मांडून बसलेले ज्योतिषी आणि पोपटवाला ज्योतिषी एकाच शहरात बघायला मिळतात. मार्ग कुठले का असेना, मुक्कामाचे ठिकाण तर एकच आहे ना! भविष्यात काय वाढून ठेवलंय? लोकसाहित्य, कला, संस्कृती यात त्याच्या पाऊलखुणा उमटलेल्या दिसतात. पिंगळा हा लोककला प्रकारही भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा. पूर्वी अनेक लोक भविष्य पाहण्यासाठी पिंगळ्याचा आधार घेत असत. पिंगळ्याने वर्तविलेले भविष्य खरेच होते, अशी ग्रामीण भागातील लोकांची समजूत होती व ती आजही तशीच असली तरी पिंगळा आता दुर्मिळ होत चालला आहे.
डमरुचा विशिष्ट प्रकारे आवाज करत पारंपरिक वेषात पहाटे सूर्योदयाच्या वेळी पारंपरिक गाणी, अभंग म्हणत जाणारा . कुडमुडे जोशी समाजातील पिगंळा बांधव चिंबळी परिसरा सध्या फिरत आहे. वासुदेव, वाघ्या, नंदीबैलवाला, बहुरुपी, भुत्या यांच्याच मालिकेतला हा पिंगळा. गळ्यात कवड्याची माळ, देवाचा टाक (चांदीच्या पत्र्यात कोरलेला छोटा देवाच्या चित्राचा ठसा), तबक, त्यात छोटी तसबीर, गळ्यात एक छोटी झोळी, धोतर किंवा हल्ली लेंगा असा हा पिंगळा सकाळी सकाळी एखाद्या घरात जाउन काही तरी बोलतो आणि ते खरं होतं! त्याच्या जीभेवर म्हणे काळा तीळ असतो. एखाद्या घराच्या अंगणात जाउन तो त्या घरातल्या माणसांच्या भवितव्याबद्दल काहीतरी विधान करतो. ते भविष्य म्हणून गणले जाते. त्याने काहीबाही अभद्र बोलू नये म्हणून घरातील वयस्कर स्त्रिया त्याला भरघोस शिधा, धान्य आणि पैसे देतात. मग तो खूश होऊन आशिर्वादपर वक्तव्य करतो. लोक त्याच्या पाया पडतात; म्हणजे त्याच्या गळ्यातल्या देवाच्या पाया पडतात. एखाद्या घरात कुणी फारशी दाद दिली नाही तर देव वाईट करेल अशी भीती घालतो. रामप्रहरी असे शिव्याशाप कोण पदरी पाडेल? त्यामुळे काहीतरी झोळीत पाडूनच तो पुढे जातो. रामप्रहर संपला की पिंगळा निष्प्रभ होतो. तो त्याच्या दैनंदिन उपेक्षित जीवनात गुरफटून जातो.

  • शाश्‍वत इन्कम नाही
    पिंगुळ ही तसा नामशेष झालेली लोककला. आजच्या तरुण पिढीला तर माहीत नसलेला प्रकार आहे. या पिगंळा बांधवांची मुले शिकल्याने या व्यवसायात तरूण पिढी येत नाही. काळाच्या ओघात ही लोककला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शाश्वत इन्कम नसल्याने या व्यवसायात कोणी येत नाही. पिढ्यान्‌ पिढ्या चालत आलेली परंपरा कशी मोडीत काढायची म्हणून हा व्यवसाय काही पिंगळे बांधव करीत आहे. लोकांचे भविष्य सांगतांना आपले भविष्य अंधारात असूनही पिढ्यानपिढ्या चालत आलेली लोककला सांभाळत धन्यता मानणारे पिंगळा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
  • पिंगळ्याची शिवकाळात मोठी भूमिका…
    शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त पैसे मिळतात, असे पिंगळे बांधवांचे म्हणणे आहे. ते म्हणतात शहरात सकाळी नऊ शिवाय दरवाजा कोणी उघडत नाही, त्यामुळे दान कमी प्रमाणात मिळते. ग्रामीण भागात सूर्य उगवण्याच्या आत कामाला सुरुवात होते. त्यामुळे पिंगळ्याला दान मिळते, असे ते म्हणतात. शिवकाळात या पिंगळ्याने मोठी भूमिका बजावल्याचे इतिहास सांगतो. स्वातंत्र्यपूर्व काळात हेरगिरीचे काम पिंगळ्याने केले. शत्रुच्या गटात काय चालले आहे याची बितंबातमी शिवाजी राजांपर्यंत पोहचविण्याचे काम यांनी केले. त्यामुळे या कलेला राजाश्रय होता, असे म्हटंले जाते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)