पावसाळ्यातील आपत्तीला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व पावसाळा पूर्वतयारीबाबत आढावा
मुंबई – गतवर्षी पावसाळ्यामध्ये आलेल्या आपत्ती व अडचणींना तोंड देत यावर्षी त्यावर मात करण्यासाठी सर्वच यंत्रणांनी परिपूर्ण तयारी केली आहे. शासनाच्या विविध यंत्रणांनी या काळात अधिक समन्वय ठेऊन अडचणींवर मात करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व पावसाळा पूर्वतयारीबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पावसाळ्यापूर्वीच्या तयारीबाबत विविध यंत्रणांनी केलेल्या तयारीचा समग्र आढावा घेतला. मुंबई महापलिका, हवामान विभाग, भारतीय सेना, भारतीय वायू सेना, भारतीय नौसेना त्याचबरोबर राज्यातील विभागीय आयुक्त यांनी आपत्ती निवारणासाठी घेतलेल्या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्यमंत्री म्हणाले, यावर्षी राज्यामध्ये पर्जन्यमान चांगले होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ही सर्वांसाठी दिलासा देणारी बाब असून या काळात आपत्ती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी यंत्रणांनी चांगली तयारी केली आहे. गेल्या वर्षी आलेल्या अडचणींवर मार्ग काढतानाच यावर्षीच्या नियोजनात त्याचे प्रतिबिंब दिसून येत आहे.
मुंबईत गेल्या वर्षी पाणी साचण्याच्या मोठ्या प्रमाणावर घटना घडल्या. या घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाल्याने यावर्षी अशा ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. नालेसफाई, रस्त्यांवरील खड्डे यासाठी मुंबई महापालिकेने विशेष नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले. मेट्रोच्या कामांमुळे पाणी साचेल अशी चर्चा आहे. त्यावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने यासाठी विशेष दक्षता घेऊन उपाययोजना केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्याबरोबरच विशेष करून मुंबईमध्ये सर्वच यंत्रणांनी पावसाळ्यामध्ये अधिक समन्वय राखत आपत्ती उद्भवल्यास सक्षमपणे तोंड द्यावे. राज्य शासनाकडून यंत्रणांना आवश्‍यक ती मदत पुरवली जाईल. हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. घोसाळीकर यांनी सादरीकरणादरम्यान सांगितले, मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले असून महाराष्ट्रात 96 ते 104 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात जूनमध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला.

आपत्ती व्यवस्थापन आराखड्याला मंजुरी
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत राज्य आपत्ती व्यवस्थापन आराखडा 2018ला मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर दुष्काळ व्यवस्थापन आराखडा आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखड्यास मंजुरी देण्यात आली. बैठकीस मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता, पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, विविध महापालिकांचे आयुक्त उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)