पावसाळ्यातही माणचे पाणीसाठे कोरडेच

पिंगळी : माण तालुक्‍यातील पिंगळी तलाव पावसाअभावी तलावात मृत पाणीसाठा उरला आहे.

जलसंधारणाची कामे झाली तरी पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती

गोंदवले, दि. 29 (प्रतिनिधी) – माण तालुक्‍याचा दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी गेल्या दोन वर्षात प्रयत्न झाले, मात्र पावसाचे प्रमाण घटल्याने यंदाही तालुक्‍यातील बहुतांशी पाणीसाठे अद्याप कोरडेच आहेत.
माण तालुक्‍याच्या भौगोलिक व नैसर्गिक रचनेमुळे पावसाचे प्रमाण कमी अधिक असल्याचे पाहायला मिळते. तालुक्‍याचे सरासरी पर्जन्यमान 450मिलिमीटर आहे. अनेकदा त्याहून खूपच कमी पाऊस पडतो. परिणामी, दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असते.
दुष्काळाच्या काळात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्‍यातील पाटबंधारे विभागाचे तलावातील पाण्याचा चांगला उपयोग होतो. तालुक्‍यात पाटबंधारे विभागाचे दहा तलाव आहेत. त्यातील माण नदीवरील आंधळी तलावात सर्वाधिक 9.28 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होऊ शकतो. राणंद व पिंगळी हे तलाव ब्रिटिशकालीन आहेत. गेल्या वर्षी पडलेल्या पावसाने ऑगस्टच्या दरम्यान तालुक्‍यातील बहुतांशी पाणीसाठ्यासह सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरले होते. परंतु, यंदा तालुक्‍यात झालेल्या जलसंधारण कामामुळे उन्हाळी पावसाचे पाणी ज्या-त्या भागात अडवले गेले त्यातच यंदा अद्याप पुरेसा पाऊस झालेला नसल्याने राणंद तलाव वगळता इतर तलाव कोरडेच आहेत. उरमोडी प्रकल्पातून पाणी सोडल्याने ढाकणी तलावातही काही प्रमाणात पाणी साठले आहे.
गेल्या काही दिवसात जिल्ह्यात सर्वत्र पावसाने चांगला जोर लावला आहे. परंतु, माणमध्ये मात्र अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे तालुक्‍यातील टाळवमधील 31.46 दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्यापैकी केवळ दोन तलावात मिळून अवघा 2.38 पाणीसाठा उरला आहे. आगामी काळात पाऊस लांबला तर पुन्हा पाणीटंचाईची समस्या डोकेवर काढण्याची शक्‍यता आहे.
माणमधील तलावांची पाणी साठवण क्षमता व कंसात सध्याची स्तिथी – आंधळी 9.28 (मृतपाणीसाठा), राणंद 7.12 (1.52), पिंगळी 2.38 (मृत पाणीसाठा), लोधवडे 0.99 (मृत पाणीसाठा), ढाकणी 3.05 (0.86), मासाळवाडी 2.42 (निरंक), गंगोती 1.79 (निरंक), जांभुळणी 2.42 (निरंक), महाबळेश्वरवाडी 2.01 (निरंक) याशिवाय नव्याने झालेला जाशी तलाव देखील कोरडाच आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)