पावसाळा संपेपर्यंत वन विभागाने कारवाई करू नये !

पिंपरी  – वन विभागाने डुडुळगाव येथील आनंदग्राम सोसायटीला अचानक जागा खाली करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सोसायटीमधील रुग्णालयातील कुष्ठरोगी आणि सोसायटीचेच जीवन शिक्षण विद्यामंदिर प्राथमिक शाळेतील तब्बल साडेतीनशे विद्यार्थ्यांचे स्थलांतर करायचे कुठे ? असा प्रश्न आनंदग्राम संस्थेपुढे उभा ठाकला आहे. यामुळे संस्थेने मागणी केली आहे की, पावसाळा संपेपर्यंत वन विभागाने कारवाई करू नये.

याबाबत संस्थेने दिलेल्या माहितीनुसार आळंदी जवळील डुडुळगाव येथील वन विभागाच्या राखीव वन सर्वे नं. 11 (गट नं 78) येथील वन क्षेत्रावर 1965 पासून आनंदग्राम सोसायटी उभी आहे. तसेच 1971 पासून संस्थेने कुष्ठरोग्यांच्या मुलांसाठी प्राथमिक शाळा सुरू केली आहे. सध्या या शाळेत साडे तीनशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने येत्या 8 ऑगस्टपूर्वी वनक्षेत्रावरील अतिक्रमण हटवावे असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे वन विभागाने आनंदग्राम संस्थेला जागा खाली करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. मात्र, अचानक नोटीस पाठवण्यात आल्याने ऐन पावसाळ्यात येथील 11 कुष्ठरुग्ण आणि जीवन शिक्षण विद्यामंदिर प्राथमिक शाळेत पहिली ते सातवी पर्यंत शिकत असलेल्या साडेतीनशे विद्यार्थ्यांचे पुनर्वसन करायचे कुठे ? असा गहन प्रशन संस्थेपुढे आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी नोटीस पाठवली असती, तर विद्यार्थ्यांचे पुनर्वसन करता आले असते. पण आता ऐन पावसाळ्यात एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांचे पुनर्वसन करायचे कुठे, याची चिंता संस्थेपुढे आहे. त्यामुळे वनविभागाने किमान पावसाळा संपेपर्यंत तरी कारवाई करू नये, अशी मागणी संस्थेतर्फे करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)