पालिका शाळेचे मूल्यांकन खासगी कंपनीकडून का?

यंत्रणा असताना खर्च कशाला? : सदस्यांची मुख्यसभेत नाराजी

पुणे – महापालिका शाळेचे मूल्यांकन खासगी कंपनीकडून करून घेण्याविषयी सदस्यांनी महापालिका मुख्यसभेत नाराजी व्यक्त केली. पूर्वी सुरू केलेल्या शाळांचे मूल्यांकन केले आहे का? महापालिका शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी शिक्षणप्रमुख, पर्यवेक्षक असताना बाहेरच्यांकडून ते करून घेण्याची आणि एवढा पैसा खर्च करण्याची गरज काय, असा प्रश्‍नही यावेळी सदस्यांनी उपस्थित केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केवळ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून उपयोग नाही, तर शिक्षकांचीही गुणवत्ता तपासून त्यामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी त्यांना मूलभूत सोयी, साधनसामग्री उपलब्ध करून दिल्या पाहिजे, असे मत धीरज घाटे यांनी मांडले.

पटसंख्या, “सीएसआर’मधून राबवले जाणारे उपक्रम, गावे समाविष्ट झाल्याने शहर हद्दीत आलेल्या शाळा, त्यातील शिक्षक याविषयीही अनेक प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केले. त्यावर उत्तर देताना प्रभारी शिक्षणप्रमुख शिवाजी दौंडकर म्हणाले, “अण्णासाहेब मगर शाळेचे स्ट्रक्‍चरल ऑडिट पूर्वी करून घेतले होते. मात्र आता पुन्हा एकदा करून घेऊ. शाळेची इमारत धोकादायक असेल तर अन्य ठिकाणी स्थलांतरीत करण्याची व्यवस्था केली जाईल, शाळांतील पटसंख्या कमी झाली नाही. तसेच सीएसआर मधून जे उपक्रम राबवले जातात किंवा कामे केली जात आहेत, त्याचा आढावा दर तीन महिन्यांनी आपण स्वत: घेत आहोत.’

“गावे समाविष्ट झाल्यानंतर तेथील जिल्हापरिषदेच्या अखत्यारितील शाळा अजून महापालिकेकडे वर्ग करण्यात आल्या नाहीत. त्या आल्यानंतर त्यांचा विचार केला जाईल. तसेच शाळांच्या बाहेर असलेल्या अतिक्रमणांवर त्वरित कारवाई करण्यात येईल,’ असे दौंडकर यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)