पुणे – पालिका देणार खेळाडूंना 2 लाखांची मदत

पुणे – साहसी खेळ, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळांसाठी तयारी करणाऱ्या पुणे शहरातील खेळाडूंना महापालिकेकडून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. महापालिकेच्या सुधारित क्रीडा धोरणात याबाबत तरतूद असून या धोरणास मुख्यसभेने मान्यता दिल्याने या मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे. 2018-19 च्या अंदाजपत्रकात प्रस्तावित करण्यात आलेल्या निधीतून ही मदत दिली जाणार आहे. यासाठी क्रीडा समिती अध्यक्ष राहुल भंडारे यांनी पुढाकार घेतला.

शहरातील अनेक उद्योन्मुख खेळाडूंकडून वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये शहराचा नाव लौकिक वाढविला जातो. मात्र, अनेकदा आर्थिक स्थिती तसेच संबंधित क्रीडा स्पर्धांसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी खेळाडूंना आर्थिक मदतीची गरज भासते. त्यासाठी अनेकदा नागरिकांकडून मदतही केली जाते, तर नगरसेवकांकडून मदतीचे प्रस्ताव ठेवले जातात. मात्र, ही मदत देण्यात शासकीय नियमांचा अडथळा ठरत असल्याने महापालिकेच्या क्रीडा समितीने केलेल्या सुधारित धोरणात प्रत्येकी 2 लाख रुपयांपर्यंत मदत देण्याचा बदल केला आहे. त्यानुसार, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेने मान्य केलेल्या क्रीडा प्रकारांसाठीच ही मदत दिली जाणार असून खेळाडूंचे मागील तीन वर्षांचे रेकॉर्ड विचारात घेतले जाणार आहेत. त्यानंतरच ही मदत दिली जाणार आहे. महापालिकेच्या 2018-19 च्या अंदाजपत्रकात या मदतीसाठी सुमारे 45 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या बदलास मान्यता मिळालेली नसल्याने अद्याप त्याबाबत काहीच करण्यात आलेले नव्हते. दरम्यान, महापालिकेच्या मुख्यसभेत या धोरणास मान्यता दिलेली असल्याने, प्रशासनाकडून तातडीने याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात खेळाडूंकडून प्रस्ताव मागविण्यात येणार असून 31 मार्च पूर्वी ही मदत दिली जाणार असल्याचे महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)