पालिका- कॅन्टोन्मेंटच्या वादात नागरिकांची फरफट

ब्रिटिशकालीन पाईपलाइन बदलण्याचे काम रखडले

पुणे : कॅन्टोन्मेंट परिसरातील नागरिकांना पाणी प्रश्‍न भेडसावत आहे. परिसरात ब्रिटिशकालीन पाईपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे ही पाइपलाइन बदलणे आवश्‍यक आहे. मात्र ती पुणे महापालिकेने बदलावी की कॅन्टोन्मेंट बोर्डाने या वादामुळे हे काम रखडले असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची फरफट होत आहे. इतकेच नव्हे, तर महापालिकेने नव्याने सुरू केलेल्या पाईपलाइनमधून पाणी घेण्यास परवानगी देण्याबाबतही महापालिका प्रतिसाद देत नसल्याचा आरोप बोर्डाच्या प्रतिनिधींनी केला आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत लष्कर परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. परिसरात बहुतांश ठिकाणी अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे; तर काही ठिकाणी पाणीच मिळत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच पाईपलाइन बदलण्याची गरज आहे. मात्र हे काम महापालिकेने करावे, यासाठी गेली तीन वर्षे बोर्डाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. परंतु महापालिका हे काम करण्यासाठी टाळाटाळ करत आहे. त्यामुळे यासंदर्भात बोर्डाचे अध्यक्ष मेजर जनरल प्रिथी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्रितपणे येऊन महापालिकेवर दबाव आणावा, असे मत नगरसेवक अतुल गायकवाड यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉ. यादव म्हणाले, “लष्कर परिसराला ज्या पाईपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो त्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परिसरात पाणीपट्टीदेखील महापालिकाच वसूल करत आहे. तरीदेखील ही पाईपलाइन दुरूस्त करण्यास पालिकेचे अधिकारी टाळाटाळ करत आहे. हे काम बोर्डानेच करावे, असा त्यांचा आग्रह आहे. मात्र बोर्डाच्या तिजोरीवर याचा 25 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. जर पाणीपट्टी महापालिका वसूल करत आहे, तर हे कामदेखील त्यांनीच केले पाहिजे.’

कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक अशोक पवार म्हणाले, “महापालिका आणि बोर्डामध्येही भारतीय जनता पक्षाचे बहुमत आहे. मात्र तरीदेखील गेली तीन वर्षे लष्कर परिसरातील पाणी प्रश्‍न सोडविण्यास बोर्डाचे लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहे. बोर्डाने नेहमीच महापालिकेला सढळ हाताने मदत केली आहे. परंतु महापालिकेचे अधिकारी अतिशय असंवेदनशीलपणे या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करत आहेत. ही अत्यंत चुकीची बाब आहे.’

लोकप्रतिनिधी घेणार गिरीश बापट यांची भेट
लष्कर परिसरातील पाणी प्रश्‍नाबाबत बोर्डाचे लोकप्रतिनिधी लवकरच पालकमंत्री गिरीश बापट यांची भेट घेणार आहेत. बापट हे कालवा समितीचे अध्यक्ष आहे. या नात्याने नवीन पाईपलाइनमधून बोर्डाला पाणी देण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यामुळेच बापट यांची भेट घेऊन त्यांच्याशी याविषयावर चर्चा करणार असल्याचे बोर्डाच्या प्रतिनिधींनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)