पालखीमार्गावरील रस्ते वाहतुकीसाठी बंद

पुणे – दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. 26 ते 28 जून रोजी संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी शहरामध्ये मुक्कामी असल्याने वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरक्षित, सुरळीत राहण्यासाठी शहरातील मार्ग बंद ठेवण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज पालख्या दि. 26 रोजी अनुक्रमे निवडुंग्या विठोबा मंदिर, नाना पेठ आणि पालखी विठोबा मंदिर येथे मुक्कामास येणार असल्याने शहरातील पालखी मार्गावरील रस्ते दुपारी बारा वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहेत.

पुणे-मुंबई रस्त्याने इंजिनिअरिंग कॉलेज चौक, संचेती चौक, सिमला ऑफिस चौक, वीर चापेकर चौक, ज्ञानेश्‍वर पादुका चौक, तुकाराम पादुका चौक, गुडलक चौक, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्त्याने विजय टॉकिज चौक, सेवासदन चौक, बेलबाग चौक, बुधवार चौक, पासोड्या विठोबा मंदिर, मोती चौक, सोन्या मारुती चौक, हमजेखान चौक, डुल्या मारुती चौक, नानापेठ पोलीस चौकी चौक येथे आल्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी अरुणा चौकमार्गे निवडुंग्या विठोबा मंदिर येथे मुक्कामी असेल. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद असेल.

तर, संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी अशोक चौक मार्गे पालखी विठोबा मंदिर येथे मुक्कामी असल्याने या परिसरातील वाहतूक वळविण्यात येणार आहे.

संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी-दिघी मॅगझीन चौक, विश्रांतवाडी, साप्रस चौकी (बॉम्बे सॅपर्स), चंद्रमा हॉटेल चौक – सादलबाबा चौक-संगमवाडी -पाटील एस्टेट चौक-इंजिनिअरिंग कॉलेज चौक हा मार्ग पहाटे तीन वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त नाशिक फाटा ते पुण्यापर्यंत रस्ता बंद करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुंबई-पुणे मार्गाहून पुण्याकडे येणारा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे, असे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.