पालक मंत्र्यांचे “त्रिकूट’ राहील का “अतूट’?

“व्हीजन-2019′ : भाजप नेत्यांची पुन्हा मोर्चेबांधणी
– अधिक दिवे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत शहरातील प्रभावशाली नेते आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आणि ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांना भारतीय जनता पक्षाने सोबत घेतले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात “प्रमोट’ केले. या “त्रिकुटा’च्या जोरावर राष्ट्रवादीचे बालेकिल्ल्यातच पानिपत केले. पण, या त्रिकूटामध्ये “फूट’ पडण्याची चिन्हे निर्माण झाल्यावर पुन्हा पालकमंत्री गिरीश बापट यांनी “त्रिकूट’ अर्थात “त्रिदेव’ पुराण सुरू केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. तसेच, राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी खऱ्या अर्थाने त्यावेळी खचली. जगताप, लांडगे आणि पानसरे यांना “एकजूट’ ठेवण्याची यशस्वी कामगिरी पालक मंत्री बापट यांनी करुन दाखवली. त्यामुळेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पराभव शक्‍य झाला.

ऐतिहासिक सत्ता परिवर्तनानंतर शहराला एखादे मंत्रिपद मिळणार, पानसरे यांना राज्यमंत्रीपद अथवा महामंडळ मिळणार, आमदार लांडगे यांना क्रीडा मंत्रीपद मिळणार किंवा आमदार जगताप यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार अशा अनेक “गाजरपार्ट्या’ झाल्या. पण, ना मंत्रिपद मिळाले ना महामंडळ त्यामुळे शहरातील भाजपचे “ब्रह्मा-विष्णू-महेश’ असलेल्या पानसरे-जगताप आणि लांडगे समर्थकांमध्ये काही अंशी नाराजी निर्माण झाली होती.

वास्तविक, पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु होताच महेश लांडगे यांनी आपले राजकीय गुरु व शहरातील ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांना भाजमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. त्यानंतर एकेकाळी कट्टर राजकीय शत्रू म्हणून ओळख असलेले भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखील राजकीय वैर सोडून पानसरे यांच्या भाजप प्रवेशासाठी अनुकूल भूमिका घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पानसरे भाजपवासी झाले होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बहुजन समाज व मुस्लिम तसेच बंजारा ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहिला. पण, भाजप पक्षश्रेष्ठींनी पानसरे यांना दिलेला शब्द पाळला नाही.

महामंडळाचे आश्‍वासन हवेत विरले. मध्यंतरी राज्यातील विधान परिषदेत त्यांना संधी मिळणार अशीही वावडी उठली. पण, पानसरे यांना न्याय मिळवून देण्यात दोन्ही आमदार आणि पालक मंत्री अपयशी ठरले. दरम्यान, पानसरे समर्थकांनी थेट भाजपविरोधात आघाडीच उघडण्याची तयारी सुरू केली होती. ही बाब मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह पालकमंत्री बापट यांच्या कानावर गेली. आमदार जगताप आणि लांडगे दोघेही पालकमंत्री गिरीश बापट यांच्या “गळ्यातील ताईत’ राहिले. पण, पानसरे बाजुला पडले. पक्षाच्या कार्यक्रमातही पानसरे यांनी पाठ फिरवली. अखेर चिंचवड येथील मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पानसरे समर्थकांनी गाऱ्हाणे मांडण्याचे ठरवले.

पिंपरीच्या हॉटेल सिट्रसमध्ये झालेल्या बैठकीच्या वेळी पानसरे समर्थकांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घालून आझम पानसरे यांच्या नावाने जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यावेळी पानसरे यांना लवकरच न्याय देवू, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. पण, यापूर्वी अनेकदा आश्‍वासन देवूनही शहराला मंत्रिपद मिळाले नाही. पानसरे यांना न्याय मिळाला नाही, मग आता पुन्हा “वेट ऍन्ड वॉच’ किती दिवस करायचे, असा प्रश्‍न आहे. मुख्यमंत्र्यांनी ठोस कृती किंवा निर्णय घेतल्याशिवाय पालक मंत्र्यांचे हे “त्रिकूट’ यापुढे “अतूट’ राहील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

जिल्ह्याचा कारभार बापट “व्हाया’ मुख्यमंत्री?
क्रांतिवीर चापेकर स्मारक संग्रहालय इमारतीच्या भूमीपूजन कार्यक्रमात सोमवारी आमदार जगताप यांनी एक खंत बोलून दाखवली. ते म्हणाले की, पुणे जिल्ह्याचा कारभार एकेकाळी चिंचवडमधून केला जात होता. पण, कालांतराने आम्ही कमी पडलो. त्यामुळे पुण्याकडे जिल्ह्याचा कारभार गेला. यावर पालकमंत्री बापट व्यासपीठावर जाहिरपणे बोलताना म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराचा कारभार जगताप, लांडगे आणि पानसरे या “त्रिकूट’ अर्थात भाजपच्या त्रिदेवांकडे आहे. पुणे जिल्ह्याचा कारभारही तेच चालवतात. पण, ते आता पहिले माझ्या कानात सांगतात आणि मग मी मुख्यमंत्र्यांना सांगतो. अशाप्रकारे वक्‍तव्य करुन पालक मंत्र्यांनी पानसरेंसह दोन्ही आमदारांच्या मनातील खंत बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भविष्यात पुणे जिल्ह्याचा कारभार पिंपरी-चिंचवडमधून पालकमंत्री बापट व्हाया मुख्यमंत्री असा होणार का? अशी चर्चा आहे.

आझम पानसरे यांना भाजपचे मानाचे पान
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांना आश्‍वासीत केले. त्यामुळे आपल्याला आता न्याय मिळेल या अपेक्षेने पानसरे समर्थक चिंचवडमधील कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या अनेक कार्यक्रमांकडे पानसरे यांनी हजेरी लावली नाही. त्यामुळे पानसरे यांची नाराजी दूर करण्यासाठी पालकमंत्री बापट यांनी यशस्वी शिष्टाई केली. सोमवारी झालेल्या कार्यक्रमात आमदार जगताप यांनी स्वत: बाजूला बसून मुख्यमंत्र्यांच्या शेजारी असलेली खुर्ची पानसरे यांना मोकळी करुन दिली. त्याद्वारे मुख्यमंत्री आणि पानसरे यांच्यात काही मिनिटे चर्चाही झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पानसरे यांची समजूत काढल्याचे बोलले जात आहे. भाजपमध्ये पानसरे यांना पुन्हा मानाचे पान देवून, राष्ट्रवादीच्या अडचणी वाढवण्यासाठी पालक मंत्र्यांसह आमदार जगताप आणि लांडगे यशस्वी होणार काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)