‘पालकांमध्ये पोषणाबाबत जनजागृती करण्यासाठी ‘राष्ट्रीय पोषण महिना’ उपक्रम राबविणार’

मोहिमेला जनचळवळीचे स्वरुप देण्याचे मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन 

मुंबई: कुपोषणमुक्तीच्या कार्यक्रमाला गती देण्याच्या तसेच जनमानसात विशेषत: पालकांमध्ये पोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने येत्या 1सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2018 दरम्यान राज्यात ‘राष्ट्रीय पोषण महिना’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास आणि महिला -बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून देशभरात हा उपक्रम राबविण्यात येणार असून महाराष्ट्रात या उपक्रमाला जनचळवळीचे स्वरुप देण्यासाठी यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘सही पोषण, देश रोशन’ असे घोषवाक्य या मोहिमेसाठी निश्चित करण्यात आले आहे. बालकांमधील कुपोषण, खुजेपणा, बुटकेपणा, रक्तक्षय कमी करणे,किशोरवयीन मुली आणि महिलांमधील रक्तक्षय कमी करणे, जन्मत: कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण कमी करणे आदी उद्दिष्ट्ये निश्चित करण्यात आली आहेत. महिला आणि बालविकास विभाग हा या मोहिमेचा नोडल विभाग म्हणून काम करणार असून ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता,माहिती व जनसंपर्क, शालेय शिक्षण, आदिवासी विकास, अन्न व औषध प्रशासन आदी विभागांच्या एकत्रित सहभागातून ही मोहीम राबविली जाणार आहे.

मोहीम कालावधीत म्हणजे 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2018 या कालावधीमध्ये पोषण आहाराविषयी जनजागृतीसाठी राज्यात ग्रामसभा, प्रभातफेरी, चित्रफितीचे प्रदर्शन आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. शून्य ते 06 वयोगटातील बालकांचे वजन घेणे व छाननी करणे, शौचालयाच्या वापराबाबत तसेच साबणाने हात धुण्याबाबत बालके, महिला, ज्येष्ठ नागरिक आदींना सवय लावणे, ग्रामस्तरावर बेटी-बेटा सांख्यिकी आकडेवारी दर्शविणारा फलक लावणे, बेटी बचाओ-बेटी पढाओ अभिसरण कृती आराखडा बैठकीचे आयोजन, महिला ई-शक्ती कार्यक्रम,एनएसएस, नेहरु युवा केंद्र, महिला बचतगट, एनजीओ आदींचा सहभाग घेणे,सॅनिटरी नॅपकिनची उपलब्धता सुलभ करणे, महिलांसाठी योगासनांचे महत्त्व पटवून देणे, आरोग्यदायी सवयींबाबत लोकजागृतीसाठी गृहभेटी करणे,किशोरवयीन मुलींकरीता जनजागृती शिबिर आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होऊन या मोहिमेला जनचळवळीचे स्वरुप द्यावे, असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.

मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश

दरम्यान, ‘राष्ट्रीय पोषण महिना’ प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.विविध विभागांच्या समन्वय आणि सहभागातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख, आयसीडीएसच्या आयुक्त श्रीमती इंद्रा मालो आदी अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)