पार्थ पवारांकडून चिंचवडमध्ये गाठीभेटी सुरू

पिंपरी – मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनी आज चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरात बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी श्रींची आरती करत अभिषेक देखील केला. गेल्या दोन दिवसांपासून ते राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत शहरातील विविध ठिकाणी भेट देत, नागरिकांशी संवाद साधत आहेत. पार्थच्या या दौऱ्यामुळे लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या अन्य राजकीय पक्षांमधील संभाव्य उमेदवारांचे टेंशन मात्र वाढले आहे.
चिंचवड दौऱ्यावेळी पार्थ यांच्यासोबत माजी महापौर अपर्णा डोके, माजी उपमहापौर राजू मिसाळ, नगरसेवक नाना काटे, संदीप पवार तसेच राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. मोरया देवस्थानच्या वतीने पार्थ यांचे स्वागत करण्यात आले. मोरया गोसावींच्या समधीचे दर्शन घेतल्यानंतर पार्थ यांनी शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीला सुरूवात केली आहे.

यावेळी पार्थ पवार यांनी मावळच्या उमेदवारीबाबत बोलण्यास नकार दिला. परंतु मी पक्षाचे काम करत असल्याचे मात्र त्यांनी आवर्जून सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून पार्थ यांनी पिंपरी चिंचवड शहराचा दौरा सुरू केला आहे. काल राष्ट्रवादीने शहरात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा त्यांनी घेतला. तर आज मोरया गोसावी समाधीचे दर्शन घेऊन नागरिक व पदाधिकाऱ्यांसोबत थेट जनसंपर्कावर भर देत भेटीगाठीला सुरूवात केल्यामुळे त्यांचाकडे राष्ट्रवादीचा मावळच्या संभाव्य उमेदवारीचा दावा आणखी बळकट केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.