पायी चालण्यासाठीचा पत्ता!

कार अथवा दुचाकीसाठी रस्त्यांची लोकांना इतकी सवय झालेली असते की पायी चालणाऱ्या माणसाला रस्ता सांगायची त्यांना वेळच येत नाही! विविध शहरांमध्ये पायी चालायची एक वेगळीच मजा असते. त्या शहरांची निराळी ओळख आपल्याला होते.

गेले काही वर्षं पुण्यात जास्तीत जास्त चालत जातेय. पत्ता विचारला की लोक बस-दुचाकी-कार जशी जाते, ते अगदी वन-वे सकट सांगतात. मग त्यांच्या लक्षात येते, मी पायी जाणार आहे. मला वन-वे, सिग्नल आणि रहदारी कशाचाच काहीही फरक पडणार नसतो! काही जण हे गृहीत धरतात की गाडी कुठेतरी पार्क करून पत्ता विचारायला आलेय. त्यांना सांगावे लागते की पायी जाण्यासाठी जवळचा रस्ता सांगा. काही जण कपडे आणि एकूण अवतार बघतात माझा. चांगल्या घरची चांगली धष्टपुष्ट पोरगी दिसतेय. पायी का फिरते, रिक्षा नाही तर किमान बस तरी करून जा, असे कळवळून सांगतात! ओला, उबर तर सहजच तोंडात बसले आहे लोकांच्या. ते सोडून पायी फिरणे म्हणजे वेळेचा अपव्यय आणि उगाच थकणे, असाच भाव असतो त्यांच्या चेहऱ्यावर.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रस्तोरस्ती संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक बसलेले असतात. त्यात आज्या आणि आजोबा सगळेच असतात. ह्यातील आजोबा मंडळी पायी रस्ता सांगायला एकदम योग्य वाटतात मला. त्यावर अजून काही विचारले, तर अजून माहिती देखील छान सांगतात ते. इतिहास वगैरे काहीही विचारून घ्या त्यांना! स्पोर्ट शूज घालून चालायला गेलेल्या आज्यादेखील इतके दूर चालत कशाला जातेस असे म्हणतात. तुम्ही खास वेळ काढून चालता, मी तोच वेळ कामासाठी वापरते, चालणे तर होतेच, कामे पण होतात, असे त्यांना म्हणते. साधारण बस ज्या वेगात जाते अत्यंत गर्दीच्या ठिकाणी, त्याहून दहा मिनिटे मला इच्छित ठिकाणी जायला जास्त लागतात चालत, असे सांगितल्यावर त्यांना एकदम भारी वाटते! विविध ठिकाणच्या इमारतींच्या मधल्या रस्त्याने केवळ वीस पंचवीस मिनिटांत आपण बरेच पुढे चालत पोहोचतो. दुचाकीनेदेखील असे फिरता येणार नाही अशा गल्ल्यांमधून.

चालणाऱ्या माणसाला असे सोपे, शॉर्टकट रस्ते जे सांगू शकतात, तेच त्या – त्या गावातले मूळ निवासी असतात, अशी चालता चालता व्याख्या केलीये मी.

– आरती मोने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)